कुपोषणामुळे राज्यात एकही बालमृत्यू झाला नसल्याचे आदिवासी विकासमंत्र्यांचे उत्तर अमान्य करत विरोधकांचा सभात्याग !
कुपोषणाच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ !
मुंबई – कुपोषणामुळे राज्यातील एकाही बालकाचा मृत्यू झालेला नसल्याची आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिलेली माहिती अमान्य करत २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे मंत्र्यांचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. या वेळी सभागृहात झालेली गोंधळाची स्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी हा तारांकित प्रश्न अल्पकालीन चर्चेत घेण्याचे निर्देश दिले.
२४ ऑगस्ट या दिवशी राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यू होत नसल्याविषयी आदिवासी विकासमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे अध्यक्षांनी हा प्रश्न राखून ठेवला होता. २५ ऑगस्ट या दिवशी हा प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्यानंतरही आदिवासी विकासमंत्र्यांनी कुपोषणामुळे बालमृत्यू होत नसल्याच्या उत्तरावर ठाम राहिले. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंत्र्यांनी दिलेले उत्तर चुकीचे असल्याचे सांगत मंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची ताकीद दिली. आमदार रवींद्र वायकर यांनी राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ६ सहस्र ५८२ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचे सभागृहात सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू’ ही सरकारसाठी कमीपणाची घटना आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले. या वेळी सभागृहात उत्तर देतांना ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या प्रमाणापत्रावर मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा उल्लेख नाही. ही सर्व माहिती सरकारकडून न्यायालयातही सादर करण्यात आली असल्याचे आदिवासी विकासमंत्र्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
कुपोषणाच्या मुद्द्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी जलसंपदा मंत्री मा. @Jayant_R_Patil यांनी जाहीर केले आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. pic.twitter.com/ljC3j7FVY9
— NCP (@NCPspeaks) August 25, 2022
आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या ‘लाज वाटणे’ शब्दावरून सभागृहात गोंधळ !
या तारांकित प्रश्नावर बोलतांना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘राज्यात कुपोषणामुळे होत असलेल्या बालमृत्यूविषयी लाज वाटली पाहिजे’, असे वक्तव्य केले. यावर सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आदिवासी विकासमंत्र्यांनी सभागृहात सादर केलेली आकडेवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांनाच्या काळातील आहे. स्वत:च्या वडिलांविषयी असे म्हणणे अयोग्य आहे. ‘लाज वाटणे’ हा शब्द असंसदीय असल्याचे कामकाजातून काढून टाकावा’, ही मागणी केली. या वेळी अध्यक्षांनी ‘लाज वाटणे’ हा असंसदीय शब्द असल्याचे नमूद करत मंत्री आणि आदित्य ठाकरे या दोघांचे वक्तव्य पडताळून निर्णय घेण्यात येईल’, असे सांगितले.