वाराणसी आश्रमाविषयी कृतज्ञताभाव असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !
उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रसाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे, प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे, विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे २९.६.२०२२ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाले. वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवन अनुभवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आश्रमाविषयी वाटणारा कृतज्ञताभाव आणि आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.
१. ‘मी साधनेला आरंभ केला, तेव्हा सनातनचे साधक फोंड्यातील सुखसागर येथे साधक सेवा करत होते. मी तेव्हा गोवा राज्यात धर्मप्रसाराची सेवा करत असे. सेवेच्या निमित्ताने मला सुखसागर येथे जाण्याची संधी मिळत असे. सुखसागर येथे गेल्यानंतर मला वाटायचे की, ‘हे स्थान किती पवित्र आहे. येथे राहून सेवा करणारे साधक किती भाग्यवान आहेत. आपल्या आयुष्यात असा क्षण कधी येईल का ?’
२. वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या कृपेने उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कुंभमेळ्यानंतर मला वाराणसी आश्रमात जायला मिळाले. त्या वेळी माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञता दाटून आली. तीच कृतज्ञता अजूनही माझ्या मनात जागृत आहे.
३. आरंभीच्या काळात आश्रम म्हणजे काय, हे मला लक्षात येत नसे. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मला समजले की, ‘इमारतीच्या भिंती म्हणजे आश्रम नाही, तर प्रत्येक साधक ही आश्रमाचीच अभिव्यक्ती (प्रतिरूप) आहे !’ त्यामुळे मी साधकांना नेहमी सांगत असतो की, ‘आपल्याला आश्रम स्वतःच्या अंतरात निर्माण करायचा आहे !’
वाराणसी आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे काही बुद्धीअगम्य पालट आणि साधकांना आलेल्या अनुभूती !
१. आश्रमाच्या परिसरातील निसर्गात जाणवलेले पालट !
अ. ‘वाराणसी येथील आश्रमाच्या प्रांगणात एक पेरूचे झाड आहे. या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात. या झाडाकडे पाहिल्यावर आनंद आणि उत्साह जाणवतो.
आ. आश्रमाच्या परिसरात आंब्याचे ४ वृक्ष आहेत. या वर्षी या वृक्षांना इतके आंबे लागले की, ते कसे संपवावे ? असा प्रश्न पडला.
इ. एरव्ही थोडी हवा आली, तरी आंबे पडत असत. यंदा हवा आली, तरी पिकण्यापूर्वी आंबे पडले नाहीत.
ई. यंदा एक दिवस लक्षात आले की, आंबे आता काढायला पाहिजेत. तसे नियोजन करायचे ठरवले. त्यानंतर १-२ दिवस झाले, तरी आंबे काढता आले नाहीत. शेवटी आम्ही या सेवेसाठी समयमर्यादा घातली आणि त्याच दिवशी सर्व आंबे काढून घेतले. त्याच्या दुसर्याच दिवशी वादळ आले. जर आम्ही आदल्या दिवशी आंबे काढून घेतले नसते, तर एकही आंबा मिळाला नसता. त्या वेळी असे वाटले की, आमचे आंबे काढून होईपर्यंत देवानेच ते वादळ थोपवून ठेवले होते.
उ. आश्रमात एक जास्वंदीचे झाड आहे. त्याला अनेक वर्षांनी फुले आली. विशेष म्हणजे एकाच फांदीला २ रंगांची फुले होती. या वेळी आम्हाला जाणवले, ‘एका फुलात प्रभु श्रीरामाचे तत्त्व आहे, दुसर्या फुलात भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व आहे.’
ऊ. आपल्या शेजारच्या घरांच्या परिसरात असलेले बेल, जास्वंद, आंबे यांसारखे सात्त्विक वृक्षही आश्रमाच्या दिशेने झुकत आहेत.
ए. आश्रमाच्या परिसरात मुंगुस, खारुताई, मोर आदी पशू-पक्षी सहजतेने वावरतात. ‘त्यांना येथे वावरण्याचे जराही भय नाही’, असे जाणवते. एक दिवस एक सुंदर मोर आश्रमाच्या परिसरात आला होता. सर्वत्र फिरून तो आश्रमाच्या फाटकावर काही काळ बसला. आम्हाला मुंगुसाचेही दर्शन होते, हा एक आध्यात्मिक शुभसंकेत असतो.
निसर्ग, तसेच पशू-पक्षी यांच्याकडून या काही मासांत मिळणारे हे शुभसंकेत पाहून ‘देव या माध्यमातून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे’, असेच वाटते.
२. लादीवर पाण्यावर लाटा आल्याप्रमाणे तरंग येणे
वाराणसी आश्रमात जुन्या पद्धतीच्या ‘मोझॅक’ लाद्या (टाईल्स) आहेत. त्या लादीवर पाण्यावर लाटा जशा दिसतात, त्याप्रमाणे लाटा आल्या आहेत. रामनाथी आश्रमातील लाद्यांवर जसे पालट दिसून येतात, त्याचप्रमाणे हे पालट जुन्या प्रकारच्या लाद्यांवरही दिसून येतात. आश्रमातील आपतत्त्व वृद्धींगत झाल्याची ही अनुभूती आहे.
३. आश्रमाचे नूतनीकरण करतांना सात्त्विक व्यक्ती धर्मकार्याशी जोडल्या जाणे
अ. मध्यंतरी वाराणसी येथील आश्रमाचे नूतनीकरण करण्यात आले. त्या नूतनीकरणाच्या कामासाठीही सात्त्विक कामगार मिळाले. त्यांपैकी काही कामगार आता गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत, तर काही कामगार नामजप करू लागले आहेत.
आ. नूतनीकरणासाठी ज्यांच्याकडून बांधकामाचे साहित्य विकत घेतले, ते वितरक आता पाक्षिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने देतात.
४. नूतनीकरणानंतर साधक आणि धर्माभिमानी यांना आलेल्या अनुभूती
अ. धर्मप्रेमी काही कालावधीसाठी आश्रमात येतात, तेव्हा ‘आनंद जाणवणे’, ‘शांती अनुभवता येणे’ अशा प्रकारच्या अनुभूती येतात. ‘धर्माभिमानी त्यांची सेवा पूर्ण करून आश्रमातून जातांना त्यांच्यात काहीतरी परिवर्तन झाले आहे’, असे जाणवते.
आ. कोरोना महामारीमुळे काही साधक आश्रमात येऊ शकले नव्हते. ते २ वर्षांनंतर आश्रमात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘आम्हाला येथे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमासारखी अनुभूती येत आहे.’
इ. ‘आश्रमाच्या नूतनीकरणानंतर वाढलेल्या चैतन्यामुळे आश्रमातील साधकांची सेवा करण्याची क्षमता वाढली आहे’, असे जाणवते. वाराणसी येथील हवामान अत्यंत प्रतिकूल असते. तेथे हिवाळ्यात पुष्कळ थंडी असते, तर उन्हाळ्यात पुष्कळ उष्णता असते. याचा परिणाम सर्वांनाच जाणवतो. थंडीच्या दिवसांत सकाळच्या वेळी उठून किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र ऊन असतांना समाजातही कोणीच बाहेर पडत नाहीत. आश्रमातील साधक मात्र सर्व स्थितीत सेवारत रहाण्याचा प्रयत्न करतात. साधकांना गुरुदेवांनी इतके बळ दिले आहे की, साधकांच्या सेवेत नैसर्गिक प्रतिकूलतेचा कोणताच अडथळा जाणवत नाही. ‘नूतनीकरणानंतर साधकांचे सेवाघंटेही वाढले आहेत’, असे लक्षात आले आहे.
५. कोरोना महामारीच्या काळात वाराणसी आश्रमाचे नूतनीकरण करतांना साधकांनी अनुभवलेली ईश्वरी कृपा !
५ अ. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक साहित्य हितचिंतकांनी स्वतःहून अर्पण देणे : कोरोना महामारीच्या काळात आश्रमासाठी सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर (तापमान मोजणारे उपकरण), ऑक्सिमीटर (वक्तीच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी दर्शवणारे उपकरण) आदींची आवश्यकता होती. तेव्हा आपल्या एका हितचिंतकांनी स्वतःहून भ्रमणभाष करून कळवले की, या वस्तू आश्रमासाठी जितक्या प्रमाणात पाहिजेत, तेवढ्या मी अर्पणस्वरूपात देणार आहे.
५ आ. कोरोनाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असतांना सेवेसाठी बाहेर गेलेल्या साधकांचे रक्षण होणे : नूतनीकरणाच्या कालावधीत बाहेर कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत होते. अशातच बांधकाम साहित्याची खरेदी आणि अन्य सेवा यांच्यासाठी आश्रमातील २ साधकांना बाहेर जावे लागत असे. या वेळी साधकांनी सर्व प्रकारची काळजी घेतली आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले. ‘प्रतिदिन समाजात मिसळत असूनही त्यांना साधा तापही आला नाही’, ही आमच्यासाठी विशेष अनुभूती आहे.’
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (२९.६.२०२२)
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या वास्तव्यामुळे वाराणसी आश्रमात जाणवत असलेले बुद्धीअगम्य पालट
१. ‘काही काळापासून ‘वाराणसी आश्रमात प्रकाश वाढला आहे’, असे जाणवत आहे.’ – श्री. गुरुराज प्रभु
२. ‘गेल्या काही मासांपासून ‘वाराणसी आश्रमाचे आकारमान वाढत आहे’, असे जाणवत आहे. प्रत्यक्षात जागा वाढलेली नाही.’ – साै. सानिका सिंह
मूळ गोवा राज्यातील सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे वाराणसी येथील धर्मप्रसारासाठी नियोजन होण्याचा त्यांना जाणवलेला कार्यकारण भाव !‘माझ्या मनात कधी कधी विचार येत असत की, ‘देवाने माझ्यासाठी वाराणसी हेच सेवेचे क्षेत्र म्हणून का निवडले ?’ त्याचे उत्तर देवाने मला यंदाच्या अधिवेशनात दिले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात गोव्यातील श्री मंगेश देवस्थानाचे सचिव म्हणाले की, ‘प्रतिवर्षी काशीचे (वाराणसी येथील) गंगाजल गोव्यातील श्री मंगेश देवस्थानात आणले जाते. त्या गंगाजलाने गाभारा स्वच्छ केल्यानंतरच देवाला अभिषेक होतो.’ यावरून काशी विश्वनाथ आणि श्री मंगेश देवस्थानचा संबंध लक्षात आला. ‘भगवान शिवाचे रूप आणि आमची कुलदेवता असलेल्या श्री मंगेशानेच मला शिवक्षेत्र असलेल्या वाराणसी आश्रमात सेवेसाठी पाठवले’, असे मला वाटते.’ – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती. (२९.६.२०२२) |
वाराणसी आश्रमाचे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्त्व !‘काशी (वाराणसी) ही शिवाच्या त्रिशूळावर स्थापित नगरी आहे. काशीनगरी प्रलयकाळातही नष्ट होत नाही. प्रलयानंतर पुढील कल्पाचा आरंभ तेथूनच होतो. अशा नगरीतील आश्रमात प्रभु श्रीरामाचे मंदिर आहे. आपत्काळ ही लयाची प्रक्रिया आहे. भगवान शिव ही लयाची देवता आहे, तर हिंदु राष्ट्राची स्थापना म्हणजे रामराज्यासम सात्त्विक राज्याची स्थापना करणेच आहे ! त्या दृष्टीने काशी क्षेत्रातील आश्रमाला लाभलेले प्रभु श्रीराम आणि भगवान शिव यांचे अधिष्ठान अत्यंत महत्त्वाचे आहे !’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |