पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार; प्रशासनाने विरोध केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवणार !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २४ ऑगस्ट (वार्ता.) – श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीतच विसर्जन करण्यात येईल. त्याला प्रशासनाने विरोध केल्यास श्री गणेशमूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात येईल. या संदर्भात मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झाल्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व ते कायदेशीर साहाय्य देईल, असे निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी चर्चा आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजन (गुरुजी) होते.
या प्रसंगी सर्वश्री पुंडलिकभाऊ जाधव, स्वप्नील आवाडे, अनिल डाळ्या, मलकारी लवटे, मोहन मालवणकर, सदानंद दळवाई, संतोष सावंत, शंतनु पोवार, शैलेश गोरे, आदित्य सासणे, संतोष कांदेकर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकार्यांनी त्यांची मते मांडली. ‘शहापूर खण मैलायुक्त सांडपाण्याने घाण झाली असून अशा सांडपाण्यात मूर्तीचे विसर्जन कधीही करणार नाही’, असेही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. या बैठकीस मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.