विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून एकनाथ खडसे आणि प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी !
विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटे स्थगित !
मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – २४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. याविषयीचे सूत्र उपस्थित करत सदस्य एकनाथ खडसे यांनी सत्ताधार्यांना याचा जाब विचारला. त्या वेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी ‘यापूर्वी इतर विभागांच्या मंत्र्यांनी प्रश्नोत्तरात उत्तरे दिली आहेत’, असे सांगून मोठ्या आवाजात खडसे यांच्याशी वाद घातला. या वेळी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होऊन एकमेकांवर आरोप करू लागले. त्यामुळे सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले.
सदस्य एकनाथ खडसे म्हणाले की, सभागृहात मंत्री नसेल, तर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी बंद करावे. मंत्री नसतांना कामकाज होऊ शकत नाही. यापूर्वी सभागृहात प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नव्हते. त्यानंतर याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी ५ मिनिटे विलंबाने येणार आहे’, असा पाठवलेला निरोप विलंबाने मिळाल्याने सदस्यांना ‘मी विलंबाने येणार आहे’, याची माहिती मिळाली नाही.