शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – आत्महत्या हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आत्महत्या करणार्यांचा नव्हे, तर हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. येथील शेतकरी केवळ महाराष्ट्राची नाही, तर देशाची भूक भागवतो. झाडाला लटकवण्याइतका तुमचा जीव स्वस्त नाही. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा सिद्ध करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत अतिवृष्टीवरील चर्चेवर उत्तर देतांना दिली.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘शेतकर्यांच्या साहाय्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. पूरग्रस्त भागात कोण आधी गेले, हे महत्त्वाचे नाही. शेतकर्यांना साहाय्य करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये काही सुचवणे हा विरोधकांचा अधिकार आहे; परंतु यावरून राजकारण करणे योग्य नाही. आम्हीही संवेदनशील आहोत. कामकाज करतांना त्रुटी राहू शकतात; परंतु काम करत रहाणे महत्त्वाचे आहे.’’
शासनाकडून राबवल्या जाणार्या विविध योजनांविषयी माहिती देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने द्यावयाच्या निधीची रक्कम ५ सहस्रांवरून १५ सहस्र रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पिकविम्यासाठीचे अर्ज यापुढे कृषी कार्यालयातही स्वीकारले जातील. नैसर्गिक संकटांमध्ये होणार्या पीकहानीचे पंचनामे ‘ड्रोन’द्वारे करण्याचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करत आहोत. वन्य प्राण्यांद्वारे होणारी पिकांची हानी रोखण्यासाठी शासन राज्यव्यापी योजना राबवणार आहे.’’