मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यांची चौकशी व्हावी ! – अमित साटम, आमदार, भाजप
देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असल्याचा साटम यांचा आरोप
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत होत आहे. महापालिकेने रस्ते, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणे यांसह प्रत्येक क्षेत्रांत घोटाळा केला आहे. त्यामुळे मागील २५ वर्षांपासून महापालिकेने केलेल्या घोटाळ्याचे अन्वेषण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांकडून करण्यात यावे, तसेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याद्वारे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी केली. (मुंबई महापालिकेतील घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक)
या वेळी अमित साटम म्हणाले की, कोरोनाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा ३ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. भ्रष्टाचारामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रलंबित असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. मुंबई शहराच्या कचर्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट होत नसल्यामुळे मुंबईचे वातावरण आणि हवामान प्रदूषित होत आहे. शहरातील शासकीय भूमीवर गृहनिर्माण सोसायट्यांना आकारण्यात आलेला अकृषक कर पूर्णपणे वगळण्यात यावा.