गणेशोत्सव मंडळाला ‘अफझलखान वधा’चा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली !
या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये उमटले !
पुणे – कोथरूड येथील गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पुणे पोलिसांनी ‘अफझलखान वध’ या विषयावरील जिवंत देखावा दाखवण्यास अनुमती नाकारली. तथापि पोलिसांचा विरोध झुगारून ‘संगम तरुण गणेशोत्सव मंडळ’ देखावा साकारण्यावर ठाम आहे. देखाव्याला अनुमती मिळवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. या मंडळाकडून प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित देखावे सादर केले जातात. ‘संगम तरुण गणेशोत्सव मंडळा’चे कार्याध्यक्ष संजय काळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, आमच्यावर गुन्हा नोंदवला, तरी चालेल; मात्र आम्ही देखावा नक्की दाखवू’, असेही त्यांनी सांगितले.
अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाकडून टीका !
‘स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवता; मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला अनुमती देत नाही’, अशी टीका पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षाकडून केली गेली. ‘अफझलखान वध’ देखाव्याची अनुमती मागितली त्यामध्ये चुकीचे काय आहे ?’, ‘अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला’, हे सत्य नाकारण्याचे कारण नाही’, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.
संपादकीय भूमिकासत्य इतिहास दाखवल्यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचे कारण सांगून पोलीस देखाव्याला विरोध करत असतील, तर हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार नव्हे का ? |