भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना अटक
|
भाग्यनगर (तेलंगाणा) – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम १५३ अ, २९५ आणि ५०५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ‘यु ट्यूब’वर टी. राजा सिंह यांनी केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर बशीरबाग येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने मुसलमानांनी एकत्र येऊन टी. राजा सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन चालू केले. या वेळी टी. राजा सिंह यांना उद्देशून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदच्या) घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुसलमानांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये (दक्षिण विभाग) बलपूर्वक प्रवेश करून निषेध नोंदवला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी टी. राजा सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना त्यांच्या घरातून अटक केली.
#Video | Hyderabad Police arrest BJP MLA Raja Singh for his alleged offensive comments against Prophet Muhammad pic.twitter.com/j0Sh1pWrDR
— NDTV (@ndtv) August 23, 2022
टी. राजा सिंह यांना ज्या व्हिडिओमुळे अटक झाली, तो १० मिनिटे २७ सेकंदांचा आहे. या व्हिडिओचे ‘फारुकी के आँख का इतिहास सुनिये’ असे शीर्षक आहे. ‘श्री राम चॅनेल तेलंगण’ नावाच्या ‘यु ट्यूब चॅनेल’वरून हा व्हिडिओ २२ ऑगस्टच्या रात्री प्रसारित करण्यात आला. यात टी. राजा सिंह यांनी विनोदी कलाकार मुन्नवर फारुकी याच्या कार्यक्रमावर टीका करतांना भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या संदर्भातून टीका केली. शर्मा यांचे थेट नाव न घेता त्यांनी केलेल्या कथित अवमानकारक विधानांचा उल्लेख टी. राजा सिंह यांनी केल्याचे यात दिसत आहे. शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर अनेक ठिकाणी आंदोलने चालू होती. अंततः टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्टला सकाळी धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.
टी. राजा सिंह भाजपमधून निलंबित
भाजपकडून त्यांचे आमदार टी. राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे, तसेच तसेच त्यांच्या कथित आक्षेपार्ह विधानाविषयी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. ‘तुमची पक्षातून हकालपट्टी का करू नये?’ असे यात विचारण्यात आले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे, तसेच त्यांच्याविषयी एक चौकशी समितीही नेमण्यात आली आहे.
आमदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पंतप्रधान मोदी समर्थन करतात का ? – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्न
टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘‘भाजप मुसलमान आणि महंमद पैंगबर यांचा द्वेष करते. भाग्यनगरमधील शांतता भाजपला पहावत नाही. भाजपला सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. मुसलमानांना भावनिक, तसेच मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा, हे भाजपचे अधिकृत धोरणा आहे. पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या नूपुर शर्मा सध्या कारागृहात आहेत का ? त्यांना भाजपने पोलीस संरक्षण दिले आहे. भाजप आमदाराने केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहेत का? तथापि मुसलमानांनी कायदा हातात घेऊ नये.’’
मी कुणाचेही नाव घेतलेले नाही ! – टी. राजा सिंह यांने स्पष्टीकरण
या व्हिडिओमध्ये टी. राजा सिंह यांनी नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानातील काही विधाने कुणाचेही नाव न घेता केली आहेत. त्यावरून त्यांना विरोध केला जात आहे. या विरोधावर टी. राजा सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी कुणाचेही नाव घेतलेले नाही.
तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राशिद खान यांचे मुसलमानांना आवाहन
(म्हणे) ‘टी. राजा सिंह यांच्या घराला आग लावा !’
‘जर टी. राजा सिंह यांना पुढील २४ घंट्यांत अटक झाली नाही, तर त्यांच्या घराला आग लावा’, असे आवाहन राज्यातील काँग्रेसचे सरचिटणीस राशिद खान यांनी मुसलमानांना केले. ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याला मी उत्तरदायी असणार नसेन. टी. राजा सिंह नेहमीच पैगंबर यांचा अवमान करतात. त्यांना अटक करा अन्यथा मी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून टाकीन’, अशीही धमकी खान यांनी दिली.
याविषयी त्यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी एक मुसलमान म्हणून पैगंबर यांचा अवामन सहन करू शकत नाही आणि म्हणूनच मी हे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिका
|