नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) – सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे. बहुमताच्या जोरावर आम्ही कोणतेही विधेयक संमत करणार नाही. नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल. थेट जनतेमधून निवड झाल्यामुळे ते जनताभिमुख कारभार करतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ ऑगस्ट या दिवशी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा)’ विधेयक आणि ‘नगर परिषदा, नगर पंचायत (सुधारणा)’ विधेयक यांवर बोलतांना केले.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये केलेल्या तरतुदीनुसारच हे होत आहे. विरोधकांना घटनेमध्ये पालट करावयाचा आहे का ? यामध्ये नगराध्यक्ष किंवा सरपंच यांच्याकडून कोणत्याही प्रकारे चुकीचे कृत्य झाल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करता येणार आहे.’’
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या विधेयकाला विरोध करतांना ‘लोकनियुक्त प्रतिनिधींऐवजी जनतेमधून सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड झाल्यास ते लोकप्रतिनिधींना जुमानणार नाहीत. त्याचा परिणाम कामकाजावर होईल’, अशी भीती व्यक्त केली.