मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या दोघांवर गुन्हा नोंद !
सांगली – मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या मुलाचे वडील किरण प्रताप भिंगारदेवे यांनी तक्रार दिली आहे.
या संदर्भात विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भाजीपाला व्यावसायिक किरण भिंगारदेवे यांच्याकडून त्यांचा मुलगा सचिन आणि सूरज भस्मे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर चाकरी लावतो; म्हणून रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी २२ मार्च २०१७ ते जून २०२२ अखेर रोख, तसेच विविध माध्यमांतून ६ लाख रुपये घेतले.
यानंतर रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांनी सचिन अन् सूरज यांना मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदावरती उपस्थित रहाण्याच्या संदर्भातील पत्र दिले; मात्र ही दोन्ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर किरण भिंगारदेवे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.