सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले (कै.) गोपाळ लक्ष्मण मुननकर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे वालावल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील (कै.) गोपाळ लक्ष्मण मुननकर (वय ७७ वर्षे) !
११.८.२०२२ या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे गोपाळ लक्ष्मण मुननकर (वय ७७ वर्षे) यांचे वालावल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे निधन झाले. २३.८.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये; तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. तृप्ती स्वप्नील भोसले (धाकटी मुलगी), ढवळी, फोंडा, गोवा.
१ अ. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यावर भावंडांना सांभाळून त्यांच्याप्रतीची कर्तव्ये पूर्ण करणे
‘माझे बाबा गोपाळ लक्ष्मण मुननकर यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांच्या आई-वडिलांचे ((कै.) सत्यवती मुननकर आणि (कै.) लक्ष्मण मुननकर यांचे) लवकर निधन झाल्याने ते त्यांच्या भावंडांना घेऊन मुंबईला गेले. त्यांनी मुंबईत ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये नोकरी केली. नोकरी करून त्यांनी त्यांच्या चारही भावंडांप्रतीची कर्तव्ये पूर्ण केली. त्यांनी त्यांच्या भावंडांच्या मुलांसाठीही बरेच काही केले.
१ आ. सनातनशी संपर्क आणि साधनेला आरंभ
१ आ १. सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ वाचून आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘साधना’ ही ध्वनीफीत ऐकून त्याप्रमाणे आचरण करणे : वर्ष १९९७ मध्ये वालावल (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आल्यावर बाबा कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. संजोग साळसकर या साधकाच्या माध्यमातून सनातनच्या संपर्कात आले. तेव्हा सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘साधना’ ही ध्वनीफीत (‘कॅसेट’) उपलब्ध होती. बाबा त्या ग्रंथांचे सतत वाचन करायचे ध्वनीफित ऐकून त्याप्रमाणे कृती करायचे. वर्ष १९९७ पासून आजतागयत ते त्यातील मार्गदर्शनानुसार आचरण करत होते.
१ आ २. नामजपादी उपाय करणे : बाबांची झोप अल्प असल्याने ते पहाटे ३ वाजता उठून नामजपाला बसत असत. ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे नामजप करणे, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि कुलदेवता यांचा नामजप करणे, अत्तर-कापूर लावणे, हे उपाय करत असत.
१ आ ३. संपर्कात येणार्या प्रत्येकाला साधनेविषयी सांगणे : ते त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला सतत सांगायचे, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक शब्द, म्हणजे प.पू. गुरुदेवांचे संदेशपत्र आहे. त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले पाहिजे.’’ ते ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘कुलदेवते’चा नामजप करण्याचे महत्त्व अन् त्यामागील कारणे प्रत्येकाला सांगायचे. नातेवाईक, शेजारी किंवा जे कुणी त्यांच्या संपर्कात येतील, त्यांच्याशी ते मायेतील काहीही बोलता साधनेविषयीच बोलायचे. घरातही ते नेहमी नामजप, उपाय आणि प्रार्थना यांविषयीच बोलायचे.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या सूत्रांचे त्वरित आज्ञापालन करणे
१. साधक श्री. प्रकाश मालोंडकर अभ्यासवर्ग घ्यायला वालावलमध्ये येत असत. त्यांनी सांगितलेले कुठलेही सूत्र बाबांना लगेच पटत असे. ‘श्री. मालोंडकर यांच्या रूपात प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्याला साधनेचा मार्ग दाखवायला येतात’, असा त्यांचा भाव असायचा.
२. ‘देवघराची मांडणी कशी असावी ?’, याविषयी कळल्यावर त्यांनी त्वरित तशी कृती करून अधिक असलेल्या देवतांच्या चित्रांचे वहात्या पाण्यात विसर्जन केले.
बाबांचे साधनेतील जीवन म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या सूत्रांचे आज्ञापालन करणे’, हेच होते.
१ ई. केलेल्या विविध सेवा
१ ई १. साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वेळेत वितरण करणे : वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यापासून बाबा नियमितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल, नेरुर, चेंदवण अन् कवठी या गावांतील ‘सनातन प्रभात’चे एकूण १५० अंकांचे वितरण करत असत. हे सर्व भाग ग्रामीण असल्याने बाबांना बरेच दूरपर्यंत चालावे लागत होते. सकाळी ६ वाजता दैनिकाचा गठ्ठा आला की, ते दुपारी १ वाजेपर्यंत दैनिकाचे वितरण करायचे. वर्ष २०२० पर्यंत बाबा दैनिकाचा गठ्ठा ज्या बसमधून यायचा, ती बस येण्याआधी १५ मिनिटे बसस्थानकावर जाऊन थांबायचे. ‘साधकांना दैनिक वेळेत मिळाले पाहिजे’, अशी त्यांची तळमळ होती.
१ ई १ अ. अनुभूती – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करतांना मार्ग चुकल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या दिसणार्या व्यक्तीने मार्ग दाखवणे : एकदा ते असेच दैनिकाचे वितरण करत असतांना मार्ग चुकले. तेव्हा त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारखा पोशाख परिधान केलेले आणि हातात काठी घेतलेले एक गृहस्थ भेटले. त्यांनी बाबांना योग्य मार्ग दाखवला. नंतर बाबांनी मागे वळून पाहिले, तर तेथे कुणीच नव्हते. घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले, ‘प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराज यांनीच त्यांना साहाय्य केले.’ तेव्हा त्यांची अखंड भावजागृती होत होती.
१ ई २. प्रत्येक सेवा भावपूर्ण करणे : ते सिंधुदुर्ग येथे झालेली सर्वधर्मसभा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) होणार्या प्रचारसभा यांच्या प्रसारासाठी जात असत. ‘सभांच्या ठिकाणी चप्पल व्यवस्था करणे किंवा प्रसाधनगृहांची स्वच्छता करणे’, या सेवाही ते सेवाभावाने करत असत. ‘सभेच्या ठिकाणची सेवा मिळणे’, हे माझे मोठे भाग्य आहे’, असे ते आम्हाला सांगत असत.
१ ई ३. ग्रंथप्रदर्शन लावणे : वालावल येथे रामनवमीला श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात जत्रा असते. तेव्हा ते ‘ग्रंथप्रदर्शन लावणे आणि घरी साधकांच्या जेवणाचे नियोजन करणे’, अशा सेवा करत असत.
१ ई ४. घरी साधक आणि संत यांची निवासव्यवस्था करणे : वर्ष १९९७ पासून वालावलमध्ये प्रत्येक आठवड्याला सत्संग होत होता. ते त्याच्या पूर्वसिद्धतेचीही सर्व सेवा करत होते. वर्ष २००० मध्ये साधकांची निवासव्यवस्था आमच्या घरी केली होती. तेव्हा आमच्या घरी सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु शकुंतला पेठेआजी येऊन गेल्या आहेत.
१ उ. भाव
१ उ १. ते सगळ्यांना ‘माझे घर म्हणजे वालावल येथील सनातनचे सेवाकेंद्र आहे’, असे सांगत असत.
१ उ २. बाबांना वाटायचे, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत आहेत. ते आपल्या घरातच आहेत.’ त्यामुळे ते घरात असले, तरी मायेतील गोष्टींविषयी बोलत नसत.
१ उ ३. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून सनातनला विरोध झाल्याचे किंवा टीका केल्याचे वाचल्यावर ‘या टीका करणार्यांना गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कोण आहेत ?’, हे ठाऊक नाही. ते महान अवतारी पुरुष आहेत’, असे ते म्हणायचे.
१ उ ४. गुरुपूजन करतांना अखंड भावजागृती होणे : वर्ष २०१८ मध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांना कुडाळ येथे गुरुपूजनाची सेवा मिळाली होती. तेव्हा पूजनाच्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते.
१ उ ५. घरात कुणीही साधक आले, तरी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आले आहेत’, या भावाने त्यांची भावजागृती होत असे.
१ उ ६. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे नाव काढले, तरी त्यांना भरून येत असे.
१ उ ७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर त्यांनी वडिलांच्या भावस्थितीचे कौतुक करणे : वर्ष २०१२ मध्ये माझ्या विवाहासाठी आमचे माहेरचे कुटुंबीय रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा बाबांची सतत भावजागृती होत होती. तेव्हा बाबांना पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘असे (बाबांसारखे) अखंड भावावस्थेतील साधक पाहून मलाच आनंद झाला. कुणीही साधक सिंधुदुर्गात गेले, तर मुननकर यांना खाऊ पाठवा.’’
१ ऊ. वर्ष २०१२ मध्ये त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली.
१ ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त होणार्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वसूचना मिळणे आणि त्याप्रमाणे घडणे : वर्ष २०१५ पासून सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मोत्सव साजरे होऊ लागले. तेव्हापासून त्यांना कार्यक्रमात होणार्या घडामोडींची दृश्ये आधीच दिसायची. त्यांना बर्याच गोष्टींच्या पूर्वसूचना मिळायच्या. ते तसे आम्हाला सांगायचे आणि नंतर तसेच घडायचे.’
२. कु. स्मृती गोपाळ मुननकर (मोठी मुलगी), वालावल, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. शेवटचे आजारपण
२ अ १. वडिलांनी त्यांना होणारे शारीरिक त्रास प्रारब्ध म्हणून स्वीकारणे आणि नामजपाकडे लक्ष देणे : ‘१०.७.२०२२ या दिवशी पहाटे बाबा स्नानगृहात तोल जाऊन पडले. आधुनिक वैद्यांनी ‘त्यांच्या उजव्या पायाचा मांडीच्या हाडाचा ३ ठिकाणी अस्थीभंग झाला असल्यामुळे त्याचे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. त्यासाठी त्यांना बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात भरती केले होते. त्यांना अस्थीभंग आणि मूत्रपिंडाचा (किडनीचा) विकार यांमुळे वेदना व्हायच्या. त्यांना उलट्याही होत होत्या; परंतु ‘हे प्रारब्ध आहे’, हे स्वीकारून ते नामजपाकडे लक्ष देत होते. ते एकदाही ‘दुखत आहे’, असे म्हणाले नाहीत. ते हातांच्या मुद्रा करून नामजप करत रहायचे.
२ अ २. बाबा त्यांच्या शेजारील रुग्ण, परिचारिका इत्यादींना ‘नामजप करायला हवा’, असे सांगत होते.
२ अ ३. बाबा रुग्णालयात असतांना गुरुपौर्णिमा होती. तेव्हा त्यांनी मला गुरुपौर्णिमेचे अर्पण द्यायची आठवण करून दिली.
२ अ ४. सद्गुरु सत्यवान कदम भेटायला आल्यावर भावजागृती होणे : १५ दिवसांनी बाबांना रुग्णालयातून घरी सोडले. घरी आल्यावर सद्गुरु सत्यवान कदम त्यांना भेटायला आले होते. बाबांसाठी सद्गुरु सत्यवानदादा म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच होते. सद्गुरु दादा आल्यावर त्यांनी मला आणि आईला स्वतःला उठवून बसवायला सांगितले. तेव्हाही त्यांची सतत भावजागृती होत होती. ते सद्गुरु दादांना नमस्कार करत होते.
२ आ. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
१. बाबांचे निधन व्हायच्या ८ दिवस आधी संध्याकाळी ते मला सांगायचे, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, आरती आणि गुरुदेवांचे मार्गदर्शन लाव.’’
२. १०.८.२०२२ या दिवशी रात्री त्यांनी ‘माझी प्रार्थनेची वही वाचायला आणून दे’, असे मला सांगितले.
२ इ. निधन
११.८.२०२२ या दिवशी सकाळी शांतपणे त्यांची प्राणज्योत मालवली. ते गेल्यावरही ‘ते जिवंत आहेत’, असेच वाटत होते.
२ ई. निधनानंतर मिळालेले शुभ संकेत !
१. माझी धाकटी बहीण सौ. तृप्ती स्वप्नील भोसले, तिचे पती श्री. स्वप्नील आणि सासरे आधुनिक वैद्य भिकाजी भोसले वालावल येथे येत असतांना त्यांना मोराचा केकारव ऐकू आला.
२. अंगणात तुळशी वृंदावनापाशी मुंगूस येऊन गेले.
३. बाबांच्या अंत्यविधीची सिद्धता चालू असतांना एक वानर घरावर येऊन शांतपणे बसले होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.८.२०२२)
|