सहभागाची निश्चिती झाल्याविना संचालकांवर कारवाई करता येणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण !
मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) – कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या अधिकोषाचे अध्यक्ष सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असून त्यांची चौकशी चालू आहे. या प्रकरणात संचालक सहभागी आहे का ? याची निश्चिती झाल्याविना त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. २२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार महेश बालदी यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित करून कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालकांवर कारवाईची मागणी केली.
यावर माहिती देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या घोटाळ्यात गुंतकवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. केंद्र सरकारने गुंतवणूकदारांच्या ५ सहस्र रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित केल्या आहेत. आतापर्यंत गुंतवणूकदारांचे ३५८ कोटी ९६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ज्यांच्या ठेवी ५ सहस्र रुपयांच्या वर आहेत, त्यांचे पैसे अद्यापही प्राप्त झालेले नाहीत.’’