भरड धान्य : काळाची आवश्यकता !
हरित क्रांतीमुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात बरीच वाढ झाली; मात्र त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांपेक्षा नकदी पिकांकडे अधिक वळू लागला. गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान पालटाचा फटका शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘आधुनिक जीवनशैली’च्या नावाखाली अनेकांच्या आहाराच्या सवयीत पालट झालेले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी वर्ष २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. भरड धान्यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर), नाचणी या पिकांचा समावेश होतो. जागतिक भरड धान्य उत्पन्नाच्या ४१ टक्के उत्पन्न भारतात होते. याचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे.
भरड धान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. यांपासून ॲलर्जीचा धोका नाही. या पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर अल्प प्रमाणात होतो. पर्यायाने उत्पादन व्यय अल्प होऊन उत्पादनात वाढ होते. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती ‘पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून ओळखली जातात आणि पचायला हलकी असतात. यामुळे भूमीतील नत्राचे प्रमाण वाढून भूमीचा पोत सुधारतो. ही धान्ये पक्ष्यांचे आवडते खाद्य असून जैवविविधता वाढते, तसेच यांपासून विविध पदार्थ सिद्ध करून विकल्याने बचत गट स्वयंपूर्ण होऊ शकतात.
यातील काही धान्यांचे गुणधर्म पाहूया. बाजरीमध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून, ते पेशींमधील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठवण्यास साहाय्य करतात. लोहाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे शरिरातील हिमोग्लोबीन वाढते. नाचणीमध्ये नैसर्गिक कॅल्शियम सर्वाधिक असल्यामुळे प्रतिदिनच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य चांगले रहाते. राळे हे पाचक असून त्यात लोह आणि खनिज पदार्थ भरपूर आहेत. वरईमध्ये उच्च लोह धातू आहे. कोडो/ कोद्रा मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट आहे. अशा प्रकारे भारतीय भरड धान्याचे महत्त्व जाणून शेतकर्यांनी नगदी पिकांच्या मागे न लागता ही पारंपरिक पिके घेऊन देश सुजलाम् सुफलाम् करावा ! पालकांनीही या धान्यांचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून मुलांना द्यावेत. जेणेकरून मुले ‘जंक फूड’च्या मागे लागून शरिराची हानी करून घेणार नाहीत.
– श्री. नीलेश पाटील, जळगाव