बीडमधील दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा करणार्या कंत्राटदाराकडून भ्रष्टाचार !
एक मासात चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री
श्री. अरविंद पानसरे, मुंबई
मुंबई – जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणीपुरवठा करणार्या ‘वतन ट्रान्सपोर्ट’ या कंत्राटदाराने खोट्या नोंदी करून लाखो रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी २२ ऑगस्ट या दिवशी तारांकित प्रश्नाद्वारे बीडमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवण्यामध्ये झालेला भ्रष्टाचार विधानसभेत उपस्थित करून त्यावर कारवाईची मागणी केली. यावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘१ मासाच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाई करू’, अशी घोषणा केली. (टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याच्या नावाखाली जनतेची लूट करणार्यांवर मागील वर्षभरात कारवाई का झाली नाही ? असे प्रकार अन्य जिल्ह्यात होऊ नयेत, यासाठी विभागाने सतर्क असणे आवश्यक आहे ! – संपादक)
१. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही संबंधित कंत्राटदार देयके काढत होता. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यासह देयकांची रक्कमही त्याच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी या वेळी केली.
२. बीड जिल्ह्यात वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट लातूर येथील ‘वतन ट्रान्सपोर्ट’ला देण्यात आले होते. या ट्रान्सपोर्टचा वतनदार आणि शासकीय अधिकारी यांनी ‘टँकरला बनावट नंबरप्लेट लावणे’, ‘जी.पी.आर्.एस्. बंद ठेवणे’, असे प्रकार करून आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी नागरिकांनी शासनाकडे केल्या होत्या. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत टाकण्याची मागणी केली आहे.
३. या वेळी लातूर आणि नाशिक येथेही असे प्रकार घडत असल्याचे तेथील आमदारांनी सभागृहात सांगितले. यावर गुलाबराव पाटील यांनी ‘बीड जिल्ह्यातील संबंधित ठेकेदाराची देयकाची ८४ लाख ७२ सहस्र रुपये रक्कम रोखून धरण्यात आली असून, राज्यात अन्य ठिकाणी असा प्रकार झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करू’, असे आश्वासन दिले.