‘जंक फूड’ !
‘जंक फूड’ म्हणजे आरोग्यासाठी अपायकारक असलेले; मात्र बनवण्यासाठी सोपे असलेले पदार्थ !’, अशी एक व्याख्या केली जाते. या व्याख्येतूनच ‘त्याची योग्यता काय आहे ?’, हे लक्षात येते. असे पदार्थ खाण्याची परंपरा संपूर्ण जगात आहे. भारतातही याचे ‘फॅड’ परदेशातूनच आलेले आहे. ते आज जनतेच्या इतके अंगवळणी पडले आहे की, ते आरोग्याला हितकारक नाही, हे भारतीय विसरूनच गेले आहेत. अशा पदार्थांवर कोणत्याही देशात बंदी नाही, हे लक्षात घ्यायला हवे; कारण हे पदार्थ प्रत्येक देशाच्या संबंधित यंत्रणेकडून प्रमाणित करण्यात आलेले असतात. ‘ते आरोग्याला अपायकारक आहेत’, असे कुठेही नमूद केलेले नसते. जरी तसे नमूद केले असते, तरी लोकांनी ते खाल्लेच असते; कारण सिगारेटच्या पाकिटावर ‘सिगारेट ओढणे अपायकारक आहे’, असे लिहिलेले असले, तरी कोट्यवधी लोक ती विकत घेतात आणि ओढतात. तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो, हे ठाऊक असूनही व्यसनी लोक त्याचे सेवन करतात, त्याचप्रमाणे जगभरात ‘जंक फूड’ आरोग्याला अपायकारक आहे, हे बहुतांश जनतेला आता ठाऊक झाले असले, तरी ते खाल्ले जाते. भारतात समोसा नावाचा पदार्थ इस्लामी देशांतून आला. मुळात यात घालण्यात येत असलेला बटाटा हाही भारतीय नाही. तोही विदेशातून भारतात आणण्यात आला आहे. तरीही आज संपूर्ण देशात समोशाचा वापर होतो. देशातील मुंबईसह अनेक शहरांत गरीब लोक बटाटावडा खाऊन दिवस ढकलतात, असेही दिसून येते. परदेशात पिझ्झा, बर्गर आदींचे सेवन केले जाते. तेही शरिराला अपायकारक आहेत, हे आता वेगळे सांगायला नको. विदेशात तर एकूणच जंक फूडवर संशोधन करण्यात आले आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या ‘स्कूल ऑफ मेडिसिन’चे प्राध्यापक डॉ. डीन शिलिंगर यांनी याविषयी संशोधन केले आहे. त्यातून त्यांनी म्हटले, ‘पिझ्झा आणि बर्गर या ‘जंक फूड’मुळे वजन वाढते. व्यायाम करूनही हा लठ्ठपणा घालवता येत नाही. तो भावी पिढ्यांसाठीही अडचणी निर्माण करू शकतो; कारण जनुकांद्वारे मुलांच्या डी.एन्.ए.मध्ये पोचून त्यांनाही लठ्ठपणा किंवा मधुमेह यांचा त्रास होऊ शकतो.’ अशी कितीही संशोधने केली आणि त्यातून वरील प्रकारचेच निष्कर्ष समोर आले, तरी हे पदार्थ बंद होण्याची किंवा याकडे लोकांकडून बहिष्कार घालण्याची शक्यता नाहीच, असे म्हणावे लागेल; कारण जंक फूड आता जगभरातील जनतेसाठी नेहमीचे खाद्यपदार्थ झालेले आहेत. ते समाजात इतके रुळले आहेत की, मोठ्यांच्याच नव्हे, तर लहान मुलांच्या हातातही आज आपल्याला विविध प्रकारची ‘चिप्स’ची पाकिटे दिसलेली आढळून येतील.
‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. पूर्वीच्या काळात लहान मुलेच नव्हे, तर मोठी माणसेही चणे, फुटाणे आदी पदार्थ खात असत. आताही त्याचे सेवन होत असले, तरी त्याचे प्रमाण अल्प झाले आहे. भारतियांनी आता अशा पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते. सामाजिक माध्यमांमधून सक्रीय असणार्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.