साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !
उत्तर भारतात प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रचाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे, प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे, विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता २९.६.२०२२ या दिवशी एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा काही भाग २२.८.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/606621.html
सद्गुरु आणि संत यांनी कथन केलेली सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये !
हनुमंताप्रमाणे दास्यभावाने धर्मकार्य करणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! – प.पू. दास महाराज
हनुमंताने ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामाची सेवा केली, त्याचप्रमाणे सद्गुरु नीलेश सिंगबाळ दास्यभावाने धर्मकार्य करत आहेत. वाराणसी येथील आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींच्या आज्ञेने हस्तस्पर्श केलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका आहेत. ज्याप्रमाणे प्रभु श्रीराम वनवासात असतांना भरताने रामरायाच्या पादुका गादीवर ठेवून राज्य केले, त्याचप्रमाणे सद्गुरु नीलेश सिंगबाळ हेही वाराणसी येथे धर्मप्रचार करत आहेत.
वाराणसी हे शिवक्षेत्र आहे आणि वाराणसी आश्रमात प्रभु रामरायाचे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरुकार्य करणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यात प्रभु श्रीराम आणि भगवान शिव या दोघांचे तत्त्व आहे.
सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे आदर्श व्यक्तीमत्त्व ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे बोलणे, चालणे इतके स्थिरतेने असते की, ‘अशी स्थिरता माझ्यात कशी येईल ?’, याचे मी चिंतन करतो. आनंदाच्या क्षणीही ते स्थिर असतात. त्यांचे व्यक्तीमत्त्व आदर्श आहे. मध्यंतरी वाराणसी येथील आश्रमाचे नूतनीकरण झाले. त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेथे गेल्या होत्या. मी त्यांना विचारले, ‘‘आता आश्रम कसा वाटत आहे ?’’ त्या वेळी त्यांनी मला पहाण्यासाठी आश्रमाची काही छायाचित्रे पाठवली. तेव्हा आश्रमाला पाहून मला पुष्कळ आनंद जाणवला. ‘तो आनंद का जाणवला ?’, याचे कारण आज पू. नीलेशदादा ‘सद्गुरुपदी’ विराजमान झाल्यानंतर समजले.
विनम्रता, आंतरिक विरक्ती यांसह धर्मप्रचाराची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !
अ. विनम्रतेचे उदाहरण ! : सद्गुरु नीलेश सिंगबाळ हे विनम्रतेचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे यांतून त्यांची विनम्रता दिसून येते. ते अत्यंत मृदुभाषी आणि मितभाषी आहेत.
आ. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन साधना करणारे आणि पूर्वीपासूनच आंतरिक विरक्ती असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! : वर्ष २००४ पासून ते वाराणसी क्षेत्री गेले आहेत. वाराणसी येथील आश्रमाचे स्वरूप आधी कसे होते ? सामान्यतः १-२ दिवसांसाठी आलेले यात्रेकरू राहू शकतील, अशा लहान लहान खोल्या तेथे होत्या. त्याच स्थितीत ते गेली १६-१७ वर्षे राहिले. वाराणसी येथे उष्णता इतकी असते की, उन्हाळ्याच्या दिवसांत पंखा चालू असूनही त्याचा काही लाभ होत नाही. त्यांच्या मनात एकदाही या सर्व परिस्थितीविषयी किंतु आला नाही. आश्रमात उपलब्ध असलेल्या सुविधांच्या व्यतिरिक्त अधिक काही हवे, असे त्यांना कधी वाटलेच नाही. ‘आपण साधना करण्यासाठी आलो आहोत, तर साधना हेच आपले प्राधान्य’, असे त्यांचे विचार होते. हे त्यांचे आंतरिक वैराग्य आहे.
यासंदर्भात एक प्रसंग आठवतो. एकदा मिरज (जिल्हा सांगली) येथील संत पू. ॐ मालतीदेवी बाळ यांच्याकडे ऋषिकेश येथून त्यांचे गुरुबंधू येणार होते. तेव्हा त्यांचे शिष्य त्या संन्यासी गुरुबंधूंचा सन्मान करण्यासाठी स्थानिक आमदार किंवा खासदार, असे लोकप्रतिनिधी उपलब्ध होतात का ? ते पहात होते. तेव्हा पू. ॐ मालतीदेवी बाळ त्यांच्या शिष्यांना म्हणाल्या, ‘‘आमदार किंवा खासदार कशाला ? संन्याशाचा सन्मान करण्यासाठी संन्यासीच हवा. गुरुबंधूंचा सन्मान करण्यासाठी सनातनच्या साधकांना बोलवा. त्यांनी भगवी वस्त्रे धारण केली नसली, तरी ते संन्यासीच आहेत.’’
त्या वेळी पू. मालतीदेवी बाळ यांनी त्या वेळी जशा सनातनच्या साधकाचे वर्णन केले होते, त्याचे मूर्तीमंत उदाहरण सद्गुरु नीलेश सिंगबाळ आहेत. भगवी वस्त्रे धारण न करताही त्यांच्यात आंतरिक विरक्ती आहे.
इ. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्याशी जोडून ठेवण्याचे कौशल्य : दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला पूर्वाेत्तर भारतातून अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित राहिले होते. गोवा येथून उत्तर भारतातील राज्ये पुष्कळ दूर आहेत, तरीही हिंदुत्वनिष्ठ एवढ्या लांब आले, याचे कारण म्हणजे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची धर्मप्रसाराची तळमळ ! गेली २ वर्षे कोरोना महामारीमुळे सद्गुरु नीलेशदादा हिंदुत्वनिष्ठांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊ शकले नाहीत; मात्र भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्याशी जोडून ठेवले आहे. अधिवक्ता, बुद्धीजिवी आदी वर्गांतील व्यक्तींना अध्यात्माचे महत्त्व पटवणे तसे कठीण असते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बुद्धीजिवींनाही चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे.
ई. वरवर कार्य न उरकता कार्याची घडी बसण्यासाठी कार्यपद्धती घालणे : कोरोना महामारीच्या काळात धर्मप्रसाराचे कार्य ऑनलाईन पद्धतीने चालू झाल्यानंतर त्या कार्याची घडी बसवण्यासाठी, त्या सेवा करतांना साधकांची साधना होण्यासाठी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी प्रयत्न केले. सेवा सुरळीत चालू रहाण्यासाठी विविध कार्यपद्धती घालण्याची पद्धत, ही हिंदु राष्ट्राची कार्यप्रणाली असेल ! त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध सेवांचे आढावे मुख्य कार्यालयात वेळेत पोचण्यासाठी सद्गुरु दादा प्रयत्नशील असतात.’
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (२९.६.२०२२)
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मी काही काळ वाराणसी येथे सेवेसाठी गेलो असता सद्गुरु नीलेशदादा यांना जवळून पाहिले. साधक त्यांना सेवेतील किंवा साधनेतील काही शंका विचारत असतांना ते अत्यंत प्रेमाने साधकांना प्रतिसाद देतात. ‘साधकांची प्रगती व्हायला हवी’, असे त्यांना आतून वाटते. यंदा अधिवेशनाला येतांनाच ‘कुणीतरी सद्गुरुपद प्राप्त करतील’, असे मला वाटत होते. ‘जे साधनेचे प्रयत्न करतात, त्यांना गुरुदेव किती भरभरून देतात’, हे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या उदाहरणातून लक्षात येते.
पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान होण्याच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना !१. ‘आज सोहळ्याला येण्याचा निरोप मिळाला, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर पू. नीलेश सिंगबाळ यांचा तोंडवळा आला. तेव्हाच मला सोहळ्याचे प्रयोजन लक्षात आले.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२९.६.२०२२) २. ‘शिबिराच्या कालावधीत पू. नीलेशदादांना हाक मारतांना ‘सद्गुरु दादा’ अशाच प्रकारे म्हटले जात होते. याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई एकदा म्हणाल्याही की, तुम्ही त्यांना आता ‘सद्गुरु दादा’च म्हणत आहात ! – पू. (सौ.) संगीता जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२९.६.२०२२) |