संभाजीनगर येथील भोंदू बाबासाहेब शिंदे यांचा बंदोबस्त न केल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देणार ! – अंबादास दानवे, विधान परिषदेचे नेते
संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारूंडी गावात येशूचा भक्त असल्याचे सांगून डोक्यावर हात ठेवून उपचार करण्याचा दावा करणारे बाबासाहेब शिंदे या भोंदूचा भांडाफोड झाल्यानंतर राजकीय पक्षांतील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे आमदार तथा विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी ‘या बाबांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी २० ऑगस्ट या दिवशी दिली आहे.
अंबादास दानवे पुढे म्हणाले, ‘‘अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका आणि कुणाचे मूत्रपिंड खराब झालेल्या आजारांवर केवळ डोक्यावर हात ठेवून बरे करण्याचा दावा करणे चुकीचे आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. निश्चितपणे यातून एक सर्वसामान्य जनतेचे मानसिक समाधान होत असेल; मात्र यातून आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे दावे करणे चुकीचे आहे, तसेच प्रशासनाने या बाबाचा तातडीने चंबूगबाळे आवरावे अन्यथा ते आम्हाला आवरावे लागेल’’, अशी चेतावणी त्यांनी दिली.
स्वतः चौकशी करून असे प्रकार थांबवण्याचाप्र यत्न करणार ! – संदिपान भुमरे, रोहयो मंत्री
पैठण तालुक्याचे शिवसेनेचे आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, ‘‘अशाप्रकारे डोक्यावर हात ठेवून आजार बरे झाले असते, तर मोठमोठी रुग्णालये उघडण्याची आवश्यकता भासली नसती. त्यांच्यावर होणारा व्ययही वाचला असता. मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे,
तसेच याची स्वतः चौकशी करून असे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’