आज कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘श्रावण व्रतवैकल्य उपक्रम’ !
कोल्हापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापुरातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशनच्या वतीने हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्या श्रावण मासाच्या निमित्ताने ४ थ्या सोमवारी म्हणजे २२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे ‘श्रावण व्रतवैकल्य’ या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी भारताचा ७५ वा अमृत महोत्सवही साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘हिंदु धर्मातील सणांची महती सर्वांना कळावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, यासाठी ८ वर्षांपूर्वी समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने या उपक्रमास प्रारंभ झाला. या उपक्रमात सकाळी श्री. कमलाकर किलकिले कावडीने पंचगंगा नदी तीरावरून पाणी आणणार आहेत. या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेक होणार आहे. यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार आहे. ११ नवदांपत्यांच्या उपस्थितीत यज्ञास प्रारंभ होईल. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत.’’
पत्रकार परिषदेत महादेवजी यादव महाराज, श्री. बाबा वाघापूरकर, हिंदु एकता आंदोलनचे श्री. हिंदुराव शेळके, श्री. चंद्रकांत बराले, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सुधीर जोशी, श्री. अशोक रामचंदानी, सर्वश्री शामराव जोशी, नंदू घोरपडे, श्रीपाद मराठे, कमलाकर किलकिले, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, पतीत पावनचे श्री. महेश उरसाल, श्री. पराग फडणीस यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.