तळमळीने सेवा करणारे आणि संशोधक वृत्तीचे फोंडा (गोवा) येथील श्री. आशिष सावंत (वय ४५ वर्षे) !
श्रावण कृष्ण एकादशी (२२.८.२०२२) या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संशोधनाची सेवा करणारे श्री. आशिष सावंत यांचा ४५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. आशिष सावंत यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
श्री. आशिषदादा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !आशिषदादांची संतांच्या सेवेची तळमळ समजल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले प्रेमाने त्यांना म्हणाले, ‘‘चप्पल किंवा टोपी घातल्याने ‘रीडिंग’ पालटले, तरी चालेल; पण तुझे स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे.’’ तेव्हापासून दादा चप्पल आणि टोपी घालू लागले. यातून ‘गुरुदेव सर्वांचा किती विचार करतात आणि त्यांची सर्वावर किती प्रीती आहे !’, हे मला शिकायला मिळाले. – श्री. गिरीश पंडित पाटील |
१. सर्वांशी जवळीक साधणे
‘आशिषदादा बालसाधकांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांशी कुटुंबियांप्रमाणे अतिशय प्रेमाने वागतात. अनेक साधकांशी दादांची जवळीक होते.
२. नृत्य आणि गायन यांची आवड
दादांना नृत्य आणि गायन यांची आवड आहे. विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांना ते उत्तम प्रकारे जमते. एकदा एक गायक असलेले संत आशिषदादांना म्हणाले, ‘‘तुमचे बोलणे ऐकतांना ‘तुमचा आवाज चांगला आहे’, असे वाटते. तुम्ही गाता का ?’’ त्यांनी दादांना गाणे म्हणायला सांगितले आणि त्यांचा आवाज ऐकून कौतुकही केले.
३. दादांची वृत्ती पुष्कळ सात्त्विक आहे.
४. ते सेवा चालू असलेल्या ठिकाणी जातात, तेव्हा ते साधनेविषयी किंवा संतांच्या सेवेतील काही प्रसंग सांगून तेथील वातावरण सकारात्मक करतात.
५. संशोधक वृत्ती
आशिषदादांना सेवा करतांना अनेक प्रयोग सुचतात. सेवा आणि सेवेचे नियोजन करतांना ‘आणखी नवीन संशोधन कसे करू शकतो ?’, हेसुद्धा त्यांना आतूनच सुचते.
६. साधनेची तळमळ
त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचा नामजप अखंड चालू आहे’, असे वाटते. दादा दिवसातून ८ ते १० घंटे सेवा करतात, तरीही ते प्रतिदिन झोपण्यापूर्वी २ घंटे नामजप करतात. त्यामुळे प्रयोगाच्या वेळी अनेक नकारात्मक वस्तूंची युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (‘यू.ए.एस्.’) उपकरणाद्वारे मोजणी करूनही दादांवर त्या वस्तूंमधील नकारात्मकतेचा परिणाम होत नाही.
७. सेवेची तळमळ
७ अ. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (‘यू.ए.एस्.’) ‘रीडिंग’ घेण्याची सेवा करतांना पादचार्यांचा विरोध होऊनही त्यांना शांतपणे सेवा आणि साधना यांविषयी सांगणे : आम्हाला ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या (‘यू.ए.एस्.’) उपकरणाद्वारे वस्तू किंवा व्यक्ती यांचे ‘रीडिंग’ घेण्याची सेवा रस्त्यावर जाऊनही करावी लागते. तेव्हा मार्गावरून ये-जा करणारे काही पादचारी आम्हाला विचारतात, ‘‘तुम्ही काय करत आहात ?’’ कधी ते विरोधही करतात; पण आशिषदादा त्यांना शांतपणे सेवा आणि साधना यांविषयी सांगतात. त्यामुळे त्यांची अनेक लोकांशी ओळख झाली आहे. आशिषदादा म्हणतात, ‘‘‘रीडिंग’ घेण्यासाठी १० मिनिटे अधिक वेळ लागला, तरी चालेल; पण त्यांना साधना कळायला हवी.’’
७ आ. दुपारच्या कडक उन्हात, तर कधी वेळप्रसंगी रात्री जागूनही सेवा करणे : दादांना ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे ‘रीडिंग’ घेण्याची सेवा करतांना प्रतिदिन अनेक घंटे मागे उलट चालत जावे लागते. ते ही सेवा कधी दुपारच्या कडक उन्हात, तर प्रसंगी पूर्ण रात्र जागूनही करतात. ते प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची सेवेची तळमळ पाहून सहसाधकांचाही सेवेचा उत्साह वाढतो.
७ इ. संतांचे ‘रीडिंग’ घेतांना दुपारच्या कडक उन्हात अनवाणी आणि डोक्यावर टोपी न घालता ६०० ते ७०० मीटर मागे चालत जाणे : एकदा एका संतांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ अधिक होती. त्यांचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे ‘रीडिंग’ घेतांना दादांना दूरपर्यंत मागे चालत जावे लागले होते. त्यासाठी दादा कडक उन्हामध्ये पायात चप्पल आणि डोक्यावर टोपी न घालता ६०० ते ७०० मीटर मागे चालत जात असत, तसेच संतांचा वेळ वाया जाऊ नये; म्हणून ते धावत परत पुढे येत असत. यातून मला दादांचा या सेवेप्रती असणारा भाव शिकायला मिळाला.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
आशिषदादांची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा आहे. गुरुदेवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे साधनेचे सर्व प्रयत्न पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असते. ते नेहमी गुरुस्मरणात असतात आणि सातत्याने विविध भावप्रयोग करतात. मी साधनेत नवीन असल्यामुळे मला ‘भावप्रयोग कसा करायचा ?’, हे कळत नव्हते. आता आशिषदादांच्या साहाय्यामुळे मला ते जमू लागले आहे.
९. जाणवलेले पालट
अ. ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे ‘रीडिंग’ घेतांना अनेकांच्या समवेत समन्वय करावा लागतो. पूर्वी हा समन्वय करतांना आशिषदादांची चिडचिड होत असे. आता त्यांची चिडचिड न्यून झाली असून ते योग्य प्रकारे समन्वय करतात.
आ. पूर्वी दादांना चुका सांगितल्यावर ते लगेच स्वीकारत नसत. आता ते चुका सांगितल्यावर लगेच स्वीकारतात आणि क्षमायाचनाही करतात.
इ. दादांचा तोंडवळा आधीच्या तुलनेत अधिक आनंदी आणि सतेज झाला आहे.
ई. काही संत आणि साधक यांनी ‘त्यांच्या तोंडवळ्यावर गुलाबी रंगाची छटा दिसते’, असे सांगितले.
१०. कृतज्ञता
आशिषदादांमुळे माझ्या स्वभावामध्ये पुष्कळ चांगला पालट झाला आहे. गुरुदेवांच्या कृपेनेच हे सर्व झाले आहे. ‘गुरुदेवांनी मला आशिषदादांसारखा उत्तम साधक आध्यात्मिक मित्र म्हणून दिला आणि त्यांच्या माध्यमातून मला साधनेचे मार्गदर्शन केले’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आशिषदादांची विहंगम गतीने आध्यात्मिक प्रगती होवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’
– श्री. गिरीश पंडित पाटील, पनवेल. (११.५.२०२२)