‘झोमॅटो’कडून हिंदूंची क्षमायाचना !
‘झोमॅटो’च्या विज्ञापनातून अभिनेते हृतिक रोशन यांच्याकडून उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा अवमान केल्याचे प्रकरण
महाकालेश्वर मंदिराविषयी नाही, तर ‘महाकाल रेस्टॉरंट’विषयी विज्ञापन असल्याचा दावा
उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘ऑनलाईन’ खाद्यपदार्थ विकणार्या ‘झोमॅटो’च्या एका विज्ञापनातून १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा अवमान करण्यात आल्याने त्याचा हिंदूंकडून तीव्र विरोध करण्यात आला. सामाजिक माध्यमांतूनही याविरोधात ट्रेंड करण्यात आला होता. यानंतर ‘झोमॅटो’कडून क्षमायाचना करण्यात आली आहे. अभिनेते हृतिक रोशन यांनी या विज्ञापनामध्ये काम केले होते. या विज्ञापनामध्ये हृतिक रोशन म्हणतात, ‘‘मी उज्जैनमध्ये होतो. मला इच्छा झाली. त्यामुळे मी ‘महाकाल’कडून थाळी (जेवण) मागवली.’ महाकाल म्हणजे महाकालेश्वर मंदिर असा त्याचा अर्थ होत असल्याने हिंदूंकडून त्याला विरोध करण्यात येत होता. याविषयी झोमॅटोने मागितलेल्या क्षमायाचने मध्ये म्हटले, ‘महाकाल थाळी’ म्हणजे उज्जैन येथील ‘महाकाल रेस्टॉरंट’मधील थाळी होय. त्याचा महाकालेश्वर मंदिराशी संबंध नाही. आमचा याद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही उज्जैनमधील नागरिकांच्या भावनांचा सन्मान करतो.’
‘Mahakal se mangaa liya..’, new Zomato ad linking Mahakaleshwar temple to food delivery ignites controversy, priest condemns the ad for hurting Hindu sentiments https://t.co/MusB9zK1aF
— OpIndia.com (@OpIndia_com) August 20, 2022
१. या विज्ञापनाचा महाकालेश्वर मंदिराच्या पुजार्यांकडूनही विरोध करण्यात आला होता. मंदिराचे पुजारी महेश यांनी सांगितले होते की, असे विज्ञापन करण्यापूर्वी आस्थापनाने विचार करायला हवा होता. हिंदू कधी आक्रमक होत नाहीत; मात्र दुसर्या धर्माविषयी अशा प्रकारचे विज्ञापन करण्यात आले असते, तर त्यांनी या आस्थापनाच्या कार्यालयाला आग लावली असती. ‘या आस्थापनाने क्षमा मागितली नाही, तर न्यायालयात जाऊ’, असेही त्यांनी सांगितले.
२. पुजारी महेश यांनी पुढे सांगितले की, महाकालेश्वर मंदिराचे अन्नछत्र आहे; मात्र तेथून भोजन घरपोच वितरण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या आस्थापनाने महाकालेश्वराच्या नावाने असे विज्ञापन करू नये. हे आस्थापन मांसाहारी पदार्थांचेही वितरण करते.
३. महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष आशिष सिंह यांनीही या विज्ञापनाचा विरोध केला. ‘मंदिराच्या अन्नछत्रातून भोजन दुसरीकडे वितरित करण्याची व्यवस्था नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे विज्ञापन बंद करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यानंतर ‘#Boycott_Zomato’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. राष्ट्रीय स्तरावर हा ट्रेंड काही काळ दुसर्या क्रमांकावर होता, तसेच बराच काळ भारतातील पहिल्या १० ट्रेंड मध्येही होता. या ट्रेंडद्वारे अनेकांनी ‘झोमॅटोने हिंदूंची क्षमा मागावी’, अशी मागणी केली. |
संपादकीय भूमिकाधर्म, देवता आदींच्या अवमानाविषयी भारतात कठोर कायदा नसल्यामुळे कुणालाच याचा धाक नाही. पाकिस्तानमध्ये अशा अवमानासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. भारतात असे कधी होईल ? |