मेहबूबा मुफ्ती पुन्हा स्थानबद्ध  !

(म्हणे) ‘केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !’ – मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना पुन्हा स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘माझ्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक तैनात असून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूपही लावण्यात आले आहे.’ त्यांनी याचे एक छायाचित्र ट्वीट केले आहे. मेहबूबा मुफ्ती यांना ३ मासांपूर्वी, म्हणजे १ मे या दिवशी प्रशासनाने त्यांच्या घरातच स्थानबद्ध केले होते. त्या वेळी आतंकवाद्यांनी ठार मारलेले काश्मिरी हिंदु राहुल भट्ट यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्या बडगामला जात होत्या. आताही त्या आतंकवाद्यांनी ठार मारलेले सुनील कुमार भट्ट यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार होत्या. (हिंदूंच्या हत्या होऊच नयेत, यासाठी मेहबूबा मुफ्ती यांनी काय केले ?, हे त्यांनी सांगायला हवे ! हिंदूंना भेटून नक्राश्रू ढाळल्याने काही होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

मेहबूबा मुफ्ती यांनी पुढे म्हटले की, केंद्र सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या निर्दयी धोरणांमुळे काश्मीर न सोडणार्‍या व्यक्तींना ठार मारले जात आहे. या माध्यमातून सरकार काश्मिरी हिंदूंपुढे आमची प्रतिमा ‘शत्रू’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच आज मला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

यात आरोप करण्यासारखे काय आहे ? जे सत्य आहे, ते कुणीही सांगेल ! काश्मीरमधील एकातरी पक्षाने कधी हिंदूंसाठी काही केले आहे का ? हे सर्वच पक्ष हिंदूंसाठी शत्रूच आहेत आणि ते हिंदूंनाही ठाऊक आहे !