सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्या वारसास्थळांना भेट देणे लाभदायक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाचा निष्कर्ष
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !
फोंडा (गोवा) – जागतिक स्तरावर आपण अयोग्य वारसास्थळांचा प्रसार करत आहोत. आपण सकारात्मक प्रभावळ असलेली वारसास्थळे निवडून त्यांचा प्रसार करायला हवा, जेणेकरून पर्यटक जेव्हा या स्थळांना भेटी देतील, तेव्हा त्यांना नकारात्मकतेच्या ऐवजी स्थळांच्या सकारात्मकतेचा लाभ मिळू शकेल, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘ग्लोबल अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूट, श्रीलंका’ यांनी आयोजित केलेल्या ‘द थर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हेरिटेज अँड कल्चर’ या परिषदेत ‘ऑनलाईन’ सहभागी होऊन बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘जागतिक वारसास्थळांशी संबंधित पर्यटन : आध्यात्मिक दृष्टीकोन’, हा शोधनिबंध ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. श्री. क्लार्क यांनी विश्वविद्यालयाच्या वतीने वारसास्थळांच्या संदर्भात केलेले आध्यात्मिक संशोधन विस्ताराने सादर केले.
श्री. शॉन क्लार्क यांनी मांडलेली संशोधनातील काही सूत्रे
१. वारसास्थळांना भेट देण्याचा व्यक्तीच्या प्रभावळीवर नेमका काय परिणाम होतो ? हे विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.
२. कोणत्याही वस्तूच्या किंवा वास्तूच्या छायाचित्रात त्या वस्तूतील अथवा वास्तूतील सूक्ष्म स्पंदने असतात आणि ती त्यांच्या छायाचित्रांतूनही प्रक्षेपित होतात. यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे ही सूक्ष्म स्पंदने सकारात्मक आहेत कि नकारात्मक ? त्याची प्रभावळ किती लांबपर्यंत आहे ? हे मोजता येते.
३. ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या आधारे ५ जगप्रसिद्ध वारसास्थळे – ताजमहाल, ‘पिरॅमिड्स ऑफ गिझा’, इंग्लंडमधील ‘स्टोनहेन्ज’, इटलीतील ‘लीनिंग टॉवर ऑफ पिसा’, रोममधील ‘कोलोसियम’ यांच्या छायाचित्रांतील सकारात्मकता आणि नकारात्मकता मोजण्यात आली. सर्व छायाचित्रांमध्ये यू.ए.एस्. उपकरण वापरून आतापर्यंत मोजण्यात आलेली सर्वाधिक नकारात्मकता आढळली. या छायाचित्रांत आढळलेली नकारात्मकतेची किमान प्रभावळ २१६ मीटर, तर कमाल प्रभावळ ४३३ मीटर होती. वरीलपैकी एकाही वारसास्थळात सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
४. याच प्रकारे आंध्रप्रदेशातील तिरुपति बालाजी मंदिराच्या छायाचित्राचेही संशोधन करण्यात आले. मंदिराच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २७१ मीटर इतकी अधिक होती, तर नकारात्मक ऊर्जा अजिबात नव्हती.
५. जगात काही स्थाने अशी आहेत, उदा. गंगा, यमुना या नद्या, जिथे पुष्कळ प्रदूषण असूनही त्यांची सकारात्मकता अबाधित आहे. वर्ष २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या वेळी राजयोगी (शाही) स्नानाच्या दिवशी २ कोटी यात्रींनी पवित्र अशा त्रिवेणी संगमात मंगल स्नान केले. असे असूनही त्यांतील सकारात्मकता आदल्या दिवशीच्या तुलनेत वाढली आहे.
६. ‘सकारात्मक स्थळे सकारात्मकता आकर्षून घेतात, म्हणून ती मंगलमय असतात. त्यामुळे नकारात्मकता प्रक्षेपित करणार्या वारसास्थळांना भेट देणे शक्यतो टाळावे’, असा निष्कर्ष या संशोधनातून निघतो; परंतु ‘जर भेट दिलीच, तर तेथील नकारात्मकतेचा स्वतःवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी त्या वेळी आपल्या धर्मानुसार नामजप करावा. नामजपामुळे आपल्याभोवती सूक्ष्म संरक्षक कवच निर्माण होते’, हेही महत्त्वाचे आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे ९५ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत १७ राष्ट्रीय आणि ७७ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ११ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार’ मिळाले आहेत. |