‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’चे घेतलेले दर्शन आणि आलेले अनुभव
सप्तमोक्षनगरींपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र काशीचे हिंदु जीवनदर्शनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडेच तेथे भगवान काशीविश्वनाथाचे दर्शन घेण्याचा सुयोग जुळून आला. या निमित्ताने ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’चे दर्शन घडले, त्याचे अनुभव सांगणारा हा लेख…
१. काशी-विश्वनाथ कॉरिडॉर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून ‘काशी-विश्वनाथ कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे काशी विश्वनाथ मंदिरातून भाविकांना थेट गंगादर्शनासाठी जाता येत आहे. या प्रकल्पाद्वारे एक प्रकारे काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार झाला आहे. पूर्वी काशीविश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी गल्ल्यागल्ल्यांतून जावे लागायचे. काशी-वाराणसीची ओळखच गल्ल्यांचे शहर अशी झाली होती. जगभरातून या गल्ल्यांमधील संस्कृतीचा शोध-बोध घेण्यासाठी तज्ञ येत होते. काशी-विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांचा मार्ग सुलभ झाला आहे. काशीसारख्या जुन्या आणि दाटीवाटीच्या नगरात असा कायापालट होणे, हे अशक्य वाटत होते; परंतु कोरोनाची प्रवासबंदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अन् पंतप्रधान मोदी यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा प्रभाव यांमुळे हा कायापालट साध्य झाला आहे, असे म्हणता येईल.
२. भाविकांनी पान खाऊन थुंकल्याने लाल रंगाने रंगलेले मंदिर प्रांगणातील भिंतींचे कोपरे !
६ मासांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी-विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प भाविकांना सुपुर्द केला. संपूर्ण बांधकाम भव्य-दिव्य आहे. रस्त्यावरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतांना भाविकांची दाटी टाळण्यासाठी सुव्यवस्थित रांगा केल्या आहेत. या व्यवस्थितपणामध्ये दिसलेला कलंक म्हणजे भाविकांनी पान खाऊन थुंकल्याने लाल रंगाने रंगलेले प्रत्येक भिंतीचे कोपरे ! नवे बांधकाम-रंगकाम झालेल्या या भिंतींवरील हा पानाचा लाल रंग चीड आणणारा होता. काशीमध्ये ‘बनारसी पान’ प्रसिद्ध आहे. पान खाऊन सर्वत्र थुंकणे, ही तेथील कुप्रथा झाली आहे. या कुप्रथेने एवढी परिसीमा गाठली आहे की, बनारसी पान खाणारे ‘मंदिर हे पवित्रस्थळ आहे’, हेच विसरले आहेत. खरे तर सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, हे लोकशिक्षण, तर पवित्रस्थळी न थुंकणे, हे धर्मशिक्षण आहे. या दोन्ही शिक्षणांची किती आवश्यकता आहे ? हे लक्षात आले.
३. दर्शन रांगांमधील एक विचित्र अनुभव
काशी-विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सामान्य रांगेत उभे होतो. दुसरी एक रांग विशेष दर्शनाची होती. साधारणतः ३०० रुपयांचा दर्शन पास काढल्यानंतर त्या रांगेतून जाता येत होते. दोन्ही रांगा एकमेकांच्या जवळून जाता येतील, अशा होत्या. प्रत्यक्षात आमचे दर्शन केवळ १५ मिनिटांत झाले, तर आमच्या शेजारील दर्शन पास काढलेल्यांच्या दर्शनाला पुष्कळ वेळ लागत होता. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर लक्षात आले की, सर्वच जण अलीकडे लवकरच दर्शन होण्याच्या उद्देशाने ‘दर्शन पास’ काढतात. त्यामुळे दर्शन पासची रांगच मोठी होते आणि सामान्य दर्शनाच्या रांगेत नगण्य लोक असतात. हा एक विचित्र अनुभव होता. खरे तर ‘तीर्थक्षेत्री देवदर्शन ही एक यात्रा आहे’, या भावाने देवदर्शन घेतले पाहिजे; परंतु हे धर्मशिक्षण न मिळाल्याने पैशांच्या प्रभावाने देवदर्शन घेण्याची कुप्रथा मंदिरांमध्ये पडत आहे, हे पाहून मन विषण्ण झाले.
४. ज्ञानवापीचे दर्शन आणि भाविकांची मुक्तेश्वरावरील अतूट श्रद्धा
मंदिरांतील दर्शन झाल्यानंतर ज्ञानवापीकडे (सध्याच्या ज्ञानवापी मशिदीकडे) तोंड करून उभ्या असलेल्या नंदीचे दर्शन घेण्यासाठी गेलो, तर तेथील अनुभव वेगळाच होता. मंदिरापेक्षा नंदीचे आणि नंदीसमोरील ज्ञानवापीचे दर्शन घेणार्यांची संख्या मोठी होती. तेथे रक्षक एकेक सेकंद दर्शन झाल्यानंतर भाविकांना पुढे लोटत होते. एरव्ही मंदिरात अशी स्थिती असते; पण ती स्थिती नंदीच्या जवळ होती. यावरून लक्षात आले की, भाविकांना काशीच्या मुक्तेश्वराचे दर्शन घेण्याची ओढ आजही आहे. ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या याचिकेमुळे ‘नंदीसमोरील ज्ञानवापीत शिवलिंग आहे’, अशी श्रद्धा भाविकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथे भाविकांची दाटी वाढली आहे. नंदीदर्शन घेतांना एक भाविक महिला नंदीच्या कानात काही तरी सांगणे करत होती. रक्षक तिला लोटण्याचा प्रयत्न करत होते. माझे दर्शन झाल्यानंतर मी त्या महिलेला गाठले आणि विचारले, ‘‘तुम्ही नंदीच्या कानात काय सांगणे केले ?’’ तिने सांगितलेले उत्तर मला अवाक् करणारे होते ! त्या म्हणाल्या, ‘‘मी नंदीला प्रार्थना केली की, ज्ञानवापीतील मुक्तेश्वर, विश्वनाथापर्यंत माझा नमस्कार पोचव.’’
ज्ञानवापीला (मशिदीला) टाळून ‘काशी-विश्वनाथ कॉरिडॉर’ बनला असला, तरी अद्यापही ज्ञानवापीतील मुक्तेश्वराच्या संदर्भातील भाविकांची श्रद्धा अतूट आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण होते !
– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (१८.८.२०२२)