विभूती लावल्यावर व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा घटणे, सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे आणि विभूतीचा परिणाम न्यूनतम ३० मिनिटे टिकून रहाणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत औदुंबर, बेल, अश्वत्थ या वृक्षांच्या समिधा, तसेच तूप, मध आदी सात्त्विक द्रव्यांचे हवन (विशिष्ट मंत्र म्हणून देवतांसाठी द्रव्य अग्नीत अर्पण करणे) केले जाते. हवनानंतर हवनकुंडातील विभूती आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावतात. ‘विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने ती लावणार्याला काय लाभ होतो ? तो न्यूनतम किती काळ टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ८.७.२०२१ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ‘आध्यात्मिक संशोधन केंद्रा’च्या नवीन वास्तूत करण्यात आलेल्या वास्तूशांती विधीच्या वेळी केलेल्या होमाची विभूती एक संत, एक साधक आणि चार साधिका यांना आज्ञाचक्रावर लावण्यास देण्यात आली. त्यांनी विभूती ‘लावण्यापूर्वी’, ‘ती लावल्यानंतर’ आणि ‘ती लावून ३० मिनिटे झाल्यावर’, अशा ३ वेळा सर्वांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
विभूती लावण्याचा विविध प्रकारच्या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासता यावा, यासाठी आध्यात्मिक पातळी (टीप १) आणि आध्यात्मिक त्रास (टीप २) या घटकांचा विचार करून निवडलेल्या एकूण ६ जणांवर ही चाचणी केली होती. चाचणीतील निरीक्षणे पुढील सारणीत दिली आहेत.
टीप १ – आध्यात्मिक पातळी : ईश्वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची १ टक्का मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. साधनेमुळे आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटून तिला महर्लाेकात स्थान प्राप्त होते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्यांना ‘संत’ म्हणतात.
टीप २ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध आणि पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
२. विभूती लावल्यानंतर व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा घटणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
अ. एक संत आणि आध्यात्मिक त्रास नसणार्या २ साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा विभूती लावल्यानंतर पूर्णपणे नष्ट झाली, तसेच ती लावून ३० मिनिटे झाल्यावरही नकारात्मक ऊर्जेत मुळीच वाढ झाली नाही.
आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या ३ जणांतील नकारात्मक ऊर्जा विभूती लावल्यानंतर पुष्कळ घटली आणि ती लावून ३० मिनिटे झाल्यावर थोडी वाढली.
इ. सर्व जणांची सकारात्मक ऊर्जा विभूती लावल्यानंतर पुष्कळ वाढली आणि ती लावून ३० मिनिटे झाल्यावर थोडी घटली.
३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि आध्यात्मिक पातळी अधिक असलेल्या व्यक्ती विभूतीमधील चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करू शकणे अन् स्वतःमध्ये अधिक काळ टिकवून ठेवू शकणे
सात्त्विक वृक्षांच्या समिधा, तूप आदी सात्त्विक द्रव्ये विशिष्ट मंत्र म्हणून हवनकुंडातील अग्नीत अर्पण केल्यावर त्याची जी राख शेष रहाते, तिला ‘भस्म’ किंवा ‘विभूती’ म्हणतात. विभूतीमध्ये चैतन्य असते. ते व्यक्तीला मिळावे; म्हणून विभूती आज्ञाचक्रावर लावतात. संत आणि आध्यात्मिक त्रास नसणार्या साधिका यांना विभूतीतील चैतन्याचा अधिक लाभ झाला आणि विभूती लावून ३० मिनिटे झाल्यावरही त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा मुळीच वाढली नाही. याउलट आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा विभूती लावल्यावर पुष्कळ घटली; पण ती लावून ३० मिनिटे झाल्यावर ती थोड्या प्रमाणात वाढली होती. हे या चाचणीतून लक्षात आले. याचे कारण ‘आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी विभूतीतील चैतन्य वापरले गेले’, हे आहे. ‘आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि आध्यात्मिक पातळी अधिक असलेल्या व्यक्ती विभूतीमधील किंवा अन्य सात्त्विक वस्तूंमधील चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करू शकतात आणि स्वतःमध्ये अधिक काळ टिकवून ठेवू शकतात’, हे यातून लक्षात येते.’
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.७.२०२२)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.