जगाची वाटचाल अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने !
आज २० ऑगस्ट २०२२ या दिवशी असणार्या ‘अक्षय्य ऊर्जा दिना’च्या निमित्ताने…
जगातील सर्व देश पृथ्वीच्या वाढत्या तापमानाविषयी चिंतित आहेत आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन न्यून करू शकणारे ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जगभरात जीवाश्म इंधनाचा (जीवाश्म इंधन म्हणजेच कार्बनची संयुगे-कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण) वापर, औद्योगिक विकास, जंगलतोड आदींमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे. ‘या वायूंचे उत्सर्जन असेच चालू राहिले, तर आणखी काही वर्षांनंतर पृथ्वीवरील बराचसा भाग रहाण्यायोग्य नसेल’, अशी भीती अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून आता संपूर्ण जग ‘अक्षय्य ऊर्जे’च्या स्रोतांकडे वळू लागले आहे. कधीही न संपणार्या ऊर्जेला ‘अक्षय्य ऊर्जा’ म्हणतात. अनेक देशांनी उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने पावलेही उचलली आहेत. २० ऑगस्ट २०२२ या दिवशी असणार्या ‘अक्षय्य ऊर्जा दिना’निमित्त याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
१. प्राचीन काळी ‘लाकूड’ हा प्रमुख ऊर्जास्रोत !
प्राचीन काळापासून ‘लाकूड’ हाच मानवाचा एकमेव ऊर्जास्रोत होता. अगदी १७ व्या शतकापर्यंत लाकूडच प्रमुख ऊर्जास्रोत म्हणून वापरले जायचे. त्यानंतर दगडी कोळसा आदींसारख्या वेगवेगळ्या ऊर्जास्रोतांचा शोध लागला. १९ व्या शतकात मोठमोठी जनित्रे निर्माण झाली. विद्युत्, खनिज तेल आदी स्रोतांनी खर्या अर्थाने ऊर्जा क्षेत्रात क्रांती केली. विद्युत् शक्तीवर चालणारी सहस्रो नवी उपकरणे आणि यंत्रे यांचा शोध लागला. आज घरातील बरीचशी कामे विजेच्या साहाय्याने होतात. वाहने ही खनिज पेट्रोलियमपासून शुद्ध केलेल्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालतात. पूर्वी दगडी कोळशावर चालणारी आगगाडीही आता विजेवर धावू लागली आहे.
२. जीवाश्म इंधनाचा अनियंत्रित वापर !
कालांतराने जीवाश्म इंधनाचा (जीवाश्म इंधन म्हणजेच कार्बनची संयुगे-कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण) वापर करणे चालू झाले. २१ व्या शतकातील वेगवान प्रगतीने मानवी जीवनशैली पालटून गेली. जीवनमान उंचावले. संपूर्ण जग या इंधनावरच अवलंबून आहे. हे अवलंबित्व इतके पराकोटीचे आहे की, काही वस्तू आणायला घरापासून १०० मीटर जरी जायचे असेल, तरी गाडीचा वापर केला जातो. जीवाश्म इंधनाच्या वापराच्या संदर्भात भारताचा विचार करायचा झाल्यास भारताने वर्ष २०१९ मध्ये जीवाश्म इंधनाच्या उत्पादनातून ९३ अब्ज डॉलर महसूल मिळवला, जो एकूण सरकारी महसुलाच्या १८ टक्के इतका आहे. अन्यही देशांची परिस्थिती उणे-अधिक प्रमाणात सारखीच आहे. आज जगभरात जीवाश्म इंधनाच्या अनियंत्रित वापराची किंमत आपल्याला वातावरण पालटाच्या रूपात मोजावी लागत आहे. लाखो लोकांना जीवित आणि वित्त हानीस सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पूर, चक्रीवादळ या आपत्तींनी घडवलेला विनाश आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे आता जीवाश्म इंधनाला पर्याय शोधले जात आहेत.
३. ऊर्जेचे मर्यादित स्रोत !
निसर्गाकडून मिळणार्या इंधनाद्वारे (उदा. कच्चे तेल, दगडी कोळसा, समुद्रातील ज्वलनशील वायू इत्यादींद्वारे) जगभरातील ऊर्जेची आवश्यकता पूर्ण केली जाते; पण ही संसाधने मर्यादित असून कधी ना कधी त्यांचा साठा संपणार आहे. यासह या संसाधनांच्या वापरामुळे प्रदूषणही होते. त्यातूनच अक्षय्य ऊर्जेच्या वापराचा विचार पुढे आला. हे ऊर्जास्रोत कधीही संपत नाहीत; म्हणूनच त्याला ‘अक्षय्य ऊर्जास्रोत’ असे म्हणतात. सौर ऊर्जा देणारा सूर्यप्रकाश, पवन ऊर्जा देणारा वारा, जलविद्युत् केंद्राद्वारे वीज उपलब्ध करून देणारे पाणी आदी अक्षय्य उर्जेचे काही प्रमुख स्रोत मानले जातात. या ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे प्रदूषणही होत नाही. या ऊर्जेच्या प्रकाराला ‘हरित ऊर्जा’ (ग्रीन एनर्जी) म्हटले जाते. आज जग या ऊर्जेच्या वापराच्या दिशेने झपझप पावले टाकत आहे.
४. जागतिक तापमानवाढ नियंत्रित ठेवण्याविषयी एकमत !
जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी ‘क्योटो प्रोटोकॉल’ आणि ‘पॅरिस करार’ यांसारखे आंतरराष्ट्रीय करार केले गेले. वर्ष २०१५ मधील ‘पॅरिस करारा’नुसार जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा अल्प ठेवण्यावर सर्व देशांची सहमती झाली आहे. त्याचप्रमाणे ती दीड अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याविषयीही सर्व देशांचे एकमत झाले होते. त्यामुळे ‘पॅरिस करारा’चे पालन करण्यासाठी जगाला जीवाश्म इंधनाचा वापर अल्प करावाच लागणार आहे. ‘जागतिक हवामान संघटने’ने सादर केलेल्या एका अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये समुद्राच्या पातळीत वाढ झाली असून समुद्रातील उष्णता, हरितगृह वायूंचे प्रमाण आणि महासागरातील आम्लीकरण यांमुळे हवामानावर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. जागतिक ऊर्जाप्रणाली कोलमडण्याच्या मार्गावर आहे. यावरून या समस्येची भीषणता लक्षात येईल.
५. हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन चिंताजनक !
जीवाश्म इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे आज संपूर्ण जग हरितगृह वायू उत्सर्जनाच्या चिंतेने ग्रासले आहे. एका संशोधनात शास्त्रज्ञांकडून ‘हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या ‘ट्रोपोस्फीयर’ आवरणाच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून त्याची उंची आणि सीमा गेल्या ४० वर्षांत २०० मीटरने वाढली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत’, अशी चेतावणी देण्यात आली आहे. अमेरिका, चीन यांसारखे युद्धखोर आणि प्रगत देशच हरितगृह वायूच्या उत्सर्जनास अधिक कारणीभूत आहेत. ‘हरितगृह वायू उत्सर्जनावर अंकुश ठेवण्याची कृती अतिशय संथ असल्याने जग आपत्तीकडे जात आहे’, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिया गुटेरेस यांनी यापूर्वीच दिली आहे. इतकेच नव्हे, तर ‘सध्या जग ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आपण अक्षय्य ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयत्न करावा’, असेही आवाहन त्यांनी केले आहे. २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात हरितगृह वायूचे उत्सर्जन निव्वळ शून्यावर पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशांनी आपापली उद्दिष्टे घोषित केली आहेत. भारताने आपण प्रदूषण आणि हवामान पालटाला कारणीभूत नसल्याचे स्पष्ट करत स्वेच्छेने हरितगृह वायू उत्सर्जनाची तीव्रता अल्प करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे.
६. वातावरणातील पालटाचा सर्वांत मोठा धोका !
‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या विज्ञान मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हवामानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ‘ट्रोपोस्फीयर’ या ध्रुवावर १० कि.मी., तर विषुववृत्तावर २० कि.मी. उंचीचे आवरण असते. याच आवरणात ढगांची निर्मिती, वार्याची गती, हवेचा दाब, आर्द्रता, तापमान, विजा, पाऊस, अशा हवामानाच्या सर्व घडामोडी घडत असतात. त्यामुळे त्यात पालट होणे, ही धोक्याची चेतावणी आहे. मनुष्याला जिवंत ठेवणारा प्राणवायूही याच थरात आहे. अभ्यास आणि निरीक्षणात आढळले की, वर्ष १९६० पूर्वी हे आवरण स्थिर होते; परंतु पृथ्वीवर मानव-निर्मित ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ची अर्थात् हरितगृह वायूची निर्मिती होत असल्याने हा वायू या थरात गोळा झाल्याने पृथ्वीचे आवरण उष्ण होते. सूर्याची उष्णता पृथ्वीवर येते; परंतु प्रदूषित वायूमुळे ही उष्णता वरील वातावरणात परत जात नाही. यालाच ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ म्हणतात.
७. जगाची अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने वाटचाल !
हरितगृह वायू उत्सर्जनाच्या चिंतेतूनच अक्षय्य ऊर्जा स्रोतांच्या वापराला महत्त्व प्राप्त झाले आणि ते वापरण्यावर अधिकाधिक भर देण्याविषयीही सर्व देशांचे एकमत झाले आहे. अक्षय्य ऊर्जास्रोतांमध्ये सौर ऊर्जा, वारा, भरती, लाटा, भूऔष्णिक आदींचा समावेश आहे. ‘जीवाश्म इंधनांच्या साठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अक्षय्य ऊर्जा हे एकच शाश्वत भविष्य आहे’, असे मत एंटोनिया गुटेरेस यांनी व्यक्त केले होते. ‘अक्षय्य ऊर्जास्रोत अत्यंत अल्प किंवा शून्य प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतात. जीवाश्म इंधनासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा ते अधिक उपयोगी ठरू शकतील’, असा जागतिक मतप्रवाह आहे. यासह जागतिक तापमानवाढ अर्थात् ‘ग्लोबल वार्मिंग’, वायू प्रदूषण इत्यादींसारख्या समस्या रोखण्याचा हाच एकमेव उपाय असल्याचेही सांगितले जाते.
८. अक्षय्य ऊर्जा स्थापित क्षमतेमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर !
गेल्या काही वर्षांत भारताचे अक्षय्य ऊर्जा क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. अक्षय्य ऊर्जा स्थापित क्षमतेमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. यासह पवन आणि सौर ऊर्जेमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. वर्ष २०३० लक्ष्यित कालावधीपूर्वी ऊर्जाकार्यक्षम माध्यमांचा अवलंब करून ‘पॅरिस करारा’चे लक्ष्य साध्य करण्यात भारत आघाडीवर आहे. भारताने वर्ष २०२१ मध्येच गैर-जीवाश्म इंधनातून ४० टक्के एकत्रित विद्युत् क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्टचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय हायड्रोजन मिशन’ची घोषणा करण्यात आली. ‘ग्रीन हायड्रोजन’ हे भारताचे सर्वांत मोठे उद्दिष्ट आहे. भूऔष्णिक ऊर्जा ही एकमेव नूतनीकरणयोग्य ऊर्जा आहे, जी सातत्याने उपलब्ध आहे आणि जिची साठवण आवश्यक नसते. लडाख येथील भूऔष्णिक प्रकल्प हा त्यातील एक आहे.
९. कार्बन उत्सर्जन न्यून करण्यासाठी भारत वचनबद्ध !
नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या जागतिक हवामान शिखर परिषदेत बोलतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत वर्ष २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्यासाठी, तसेच वर्ष २०३० पर्यंत एकूण अनुमानित उत्सर्जनातून १ अब्ज टन कार्बन उत्सर्जन न्यून करण्यासाठी वचनबद्ध आहे’, असे सांगितले. यासह पंतप्रधानांनी ‘जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा १७ टक्के असूनही भारत केवळ ५ टक्के कार्बन उत्सर्जनासाठी उत्तरदायी आहे’, असे स्पष्ट केले. या प्रसंगी त्यांनी हवामान पालटाविषयी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणार्या देशांना कानपिचक्याही दिल्या. भारताने वर्ष २०३० पर्यंत आपल्या उर्जेच्या ५० टक्के गरजा अक्षय्य ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचेही उद्दिष्ट ठेवले आहे.
१०. मर्यादा आणि आव्हाने !
अक्षय्य ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून ऊर्जा उत्पादनाची क्षमता मर्यादित आहे. याव्यतिरिक्त हरित ऊर्जा उत्पादनासाठी अधिकाधिक जागा आणि साहित्याचीही आवश्यकता असते. हेच या क्षेत्रातील मुख्य आव्हान आहे. तथापि या मर्यादा आणि आव्हाने यांवर मात करून अक्षय्य ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे, हे पृथ्वीच्या अन् पर्यायाने अखिल मानवाच्या हिताचे आहे.
११. विज्ञानाचे दुष्परिणाम !
सहस्रो वर्षांपासून प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने अवघ्या १०० वर्षांत इतकी प्रदूषित करून टाकली की, त्याचा मानवावर जीवघेणा परिणाम होत आहे. विज्ञानाचे यापेक्षा गंभीर परिणाम दुसरे कुठले असू शकतील ?
१२. आध्यात्मिक ऊर्जा हीच शाश्वत ऊर्जा !
कुठलीही गोष्ट चालण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. स्थुलातील कुठलीही ऊर्जा असो, तिला बंधने आणि मर्यादा असू शकतात. तथापि मनुष्याचे जीवन चालण्यासाठी ऊर्जेची व्यवस्था देवानेच करून ठेवली आहे आणि ती म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा ! ही ऊर्जा शाश्वत, चिरस्थायी आणि आनंददायी आहे. ही ऊर्जा मिळवण्यासाठीही प्रत्येक मनुष्याला प्रयत्न करणे, म्हणजेच साधना (धर्माचरण) करणे आवश्यक आहे.
– श्री. नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२२)
संपादकीय भूमिकाविज्ञानाने निर्मित केलेल्या ऊर्जेपेक्षा आध्यात्मिक ऊर्जा प्रदूषणमुक्त, चिरंतन आणि आनंददायी आहे ! |