भीती दाखवून महिला पोलिसाची १० सहस्र रुपयांची फसवणूक !
पुणे – इतरत्र स्थानांतर करण्याची भीती दाखवून येरवडा कारागृहातील महिला पोलिसाची अज्ञात व्यक्तीने १० सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली. एडीजी कार्यालयामधील कारकून (क्लार्क) बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने महिला पोलिसाला ‘गूगल पे’ या ॲपवर पैसे पाठवण्यास सांगितले. ‘तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, त्या ठिकाणाहून ५ ते ६ तक्रारी आल्या असून तुमच्या विभागातील ५ मुलींनाही कामावरून काढले आहे’, असे अज्ञात व्यक्तीने सांगितले. ही महिला येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.