शेतकर्यांना भरघोस साहाय्य करू आणि महाराष्ट्राला दिलासा देऊ ! – प्रवीण दरेकर, भाजप
विधान परिषद कामकाज
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापूर, तसेच अन्य विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात समन्वयाच्या अभावामुळे पूरग्रस्त आणि शेतकरी यांना दिलासा मिळाला नाही. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी पाठवल्यानंतरही तो अखर्चित राहिला. शेतकर्यांची वीज थकबाकी राहिल्यावर शेतकर्यांची वीज तोडण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात केवळ नुसत्याच घोषणा करण्यात आल्या. ‘येणार्या काळात आम्ही शेतकर्यांना भरघोस साहाय्य करू आणि महाराष्ट्राला दिलासा देऊ’, असे आश्वासन भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले.
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यासह अन्य काही सदस्यांनी जुलै-ऑगस्ट २०२२ या काळात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा यांसह राज्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाली असून जिरायती, बागायती पिके आणि पशूधन यांची हानी झाली, तसेच १२५ पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. या संदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजना यावर २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते.
या प्रसंगी चर्चा करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘सरकार किती कालावधीत पंचनामे करणार, तसेच साहाय्य देणार आहे, हे घोषित करावे. पूर परिस्थितीत ज्यांचे घरदार वाहून गेले, त्यांच्यासाठी ४०० ते ६०० रुपये भत्ता देण्याची व्यवस्था आहे; मात्र तो कुणालाच मिळालेला नाही. बैल मृत्यूमुखी पडल्यावर ३० सहस्र रुपये शासकीय साहाय्य दिले जाते; मात्र तेही तुटपुंजे आहे. गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुम लागतो; मात्र एक वर्षाच्या कालावधीत ‘रॉयल्टी’ भरूनही १ ब्रासही मुरुम मिळत नाही. याउलट अवैधरितीने तो मिळतो.’’