दहीहंडीचा साहसी खेळात समावेश, शासन आयोजित करणार स्पर्धा !
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, तसेच वर्ष २०२३ पासून ‘प्रो गोविंदा स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.
दहीहंडीच्या वेळी अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू आल्यास गोविंद पथकांचा १० लाख रुपये, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे २ अवयव निकामी झाल्यास ७ लाख ५० सहस्र रुपये, तर गंभीर दुखापत झाल्यास ५ लाख रुपये इतका विमा शासनाकडून उतरवण्यात येणार आहे, असे या वेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी या वेळी दहीहंडीच्या वेळी दुखापत होणार्या गोविंदांवर विनामूल्य उपचार करण्याची मागणी सभागृहात केली. ही मागणीही मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुखापत होणार्या गोविंदांवर शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार करण्याचे आदेश दिले. १८ वर्षाखालील गोविंदाला आर्थिक साहाय्य मिळणार नाही.