२५ ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपूर्वी बुजवण्यात येतील. २६ ऑगस्ट या दिवशी कोकणातील आमदारांसह रस्त्याची पहाणी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयीची लक्षवेधी विधानसभेत उपस्थित केली होती. या लक्षवेधीत रस्त्याचे १२ वर्षे रखडलेले काम मार्गी लावण्याच्या चर्चेवर भर देण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप केले.
‘मागील ५ वर्षांत या महामार्गावर ६ सहस्र ६९२ अपघात झाले असून १ सहस्र ५१२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देत महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग न्यायप्रविष्ट असल्यामुळे म्हटले. त्या वेळी भाजपच्या आमदारांनी ‘अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या काळात काम का केले नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी कोकणातील आमदार राजन साळवी, नीतेश राणे, रवींद्र वायकर यांनीही महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन सरकारला केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, तसेच गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, अशी ग्वाही विधानसभेत दिली.
या वेळी आमदार नीतेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कोसळणार्या दरडींवर उपाययोजना म्हणून जाळी बसवण्याची मागणी केली. त्यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.