किडनी प्रत्यारोपणातील अपहाराच्या चौकशीला ४ मासांनंतरही विलंब !
१ मासात अंतरिम अहवाल देण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश !
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालय, इनामदार रुग्णालय आणि ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालय यांमधील किडनी प्रत्यारोपणात झालेल्या आर्थिक अपहाराची चौकशी ४ मासांनंतरही पूर्ण झालेली नाही. याविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मासात या प्रकरणाचा अंतरिम अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
… तर रुग्णालयाची मान्यता रहित करण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
४ मासांतही या प्रकरणाचा अहवाल आलेला नाही. अशा गंभीर प्रकरणात तत्परतेने कारवाई व्हायला हवी. याविषयी एका मासात अंतरिम अहवाल देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयाचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रहित करण्यात येईल, तसेच डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.