हत्तीरोगाविषयी आरोग्यमंत्र्यांना उत्तरे देता न आल्याने विधानसभेत प्रश्न राखून ठेवण्याची वेळ !
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्यात आला. संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.
१. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी संमत अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण पदे किती ? भरण्यात आलेली पदे किती ? रिक्त पदांची संख्या किती ? हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी किती रुपये निधी संमत झाला ? मागील वर्षभरात किती निधी व्यय झाला ? या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती.
२. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात पालघर जिल्ह्यातील ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यांतील २९ बालकांना या रोगाची लागण झाली.
३. अजित पवार यांनी ‘हत्तीरोगामुळे शरीर अकार्यक्षम होते. यावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत’, याकडे लक्ष वेधले.