मुलांवर संस्कार कसे कराल ?
सध्या अनेक पालक ‘आमचे मूल पुष्कळ हट्टी आहे, कुणाचेच ऐकत नाही’, ‘त्याच्या मनासारखे केले नाही, तर खात नाही’, ‘चष्मा आहे, तरी भ्रमणभाषवर सतत कार्टून पहातो’, ‘पिझ्झा-बर्गर-वेफर्स-चॉकलेट्स आवडत असल्याने पोळी-भाजी खात नाही’, आदी अशा अनेक तक्रारी करत असतात. येथे ‘मुले अशी का वागतात?’, हा विचार पालकांनीच करायला हवा. यामध्ये आपण मुलांवर संस्कार करायला कुठे अल्प पडलो ? याचे चिंतन झाले, तरच मुलांवर पालकांकडून योग्य संस्कार होतील.
मुलांना लहानपणी योग्य-अयोग्य याची जाण नसते. प्रत्येक कृती किंवा विचार योग्य काय ? हे त्याला सांगावे लागते. यासाठी प्रसंगी कठोर व्हावे लागते. असे झाले नाही किंवा यामध्ये दिरंगाई झाल्यास मुले कधी आणि किती प्रमाणात बिघडतील, याचा अंदाज बांधता येत नाही. सध्या मुलाचा हट्टीपणा हा पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. ‘मुलाचा स्वभाव असाच राहिला, तर पुढे कसे होणार ?’, याची काळजीही पालकांना सतावत असते. या सर्वांमध्ये पालकांचे दायित्व काय आहे ? हेही पाहिले पाहिजे. पालकांनी केवळ तक्रारींचा सूर लावून उपयोग नाही किंवा मुलाच्या दोषावर बोट ठेवून त्याला सतत घालून पाडून बोलणेही टाळले पाहिजे.
पालकांनी प्रत्येक कृती योग्य करण्याची सवय स्वतःपासून लावल्यास मुलांवर चांगले संस्कार होतील. मुले अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचे आचरण प्रत्येक दृष्टीने योग्य करायला हवे. खाण्याच्या सवयींपासून ते झोपण्याच्या आणि दूरदर्शन पहाण्याच्या वेळा अशा प्रकारे सर्वच गोष्टी मुलांच्या समोर आदर्श असायला हव्यात. मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी त्यांच्यातील सात्त्विकता वाढणे आवश्यक आहे. ही सात्त्विकता धर्माचरणाने वाढते. धर्माचरणामध्ये प्रतिदिन देवपूजा करणे, देवाला आणि घरातील मोठ्यांना नमस्कार करणे, जेवणापूर्वी आपल्या उपास्यदेवतेला प्रार्थना करणे या अन् यांसारख्या अनेक कृती आहेत. याची मुलांना सवय लावल्यास त्या त्यांना सहज करता येतील. यासाठी पालकांनी धर्मशिक्षण घेणे आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे. असे केल्यास मुलांमधील सत्त्वगुण वाढून त्यांच्यावर ‘संस्कार’ करणे सोपे जाईल. पालकांनो, हताश न होता स्वतः योग्य-अयोग्य समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि देशासाठी सुसंस्कारित भावी पिढी घडवा !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.