तिकीट यंत्राच्या रोलचा तुटवडा असल्यामुळे ४ जणांत मिळून १ तिकीट !
सातारा, १८ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर संपामुळे गतप्राण झालेली एस्.टी. आता पूर्वपदावर येऊ लागली आहे; मात्र एस्.टी.च्या समस्या संपता संपेनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या सातारा आगारामध्ये तिकीट यंत्राच्याच कागदी रोलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे एकाच थांब्यावर उतरणार्या ४ प्रवाशांत मिळून १ तिकीट दिले जात आहे. यामुळे वाहकाची डोकेदुखी वाढली असून प्रवासीही संताप व्यक्त करत आहेत. (सामान्य सुविधा न उपलब्ध होणे, ही प्रशासनाची अकार्यक्षमताच नव्हे का ? – संपादक)
काही वर्षांपासून यंत्रावर तिकीटे दिली जात आहेत. यामुळे वाहकाचा तिकीट क्रमांक लिहिणे आणि हिशोब जुळवण्याचा त्रास वाचला होता; मात्र आता सातारा आगारातील वाहकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. तिकीट यंत्रासाठी लागणार्या कागदी रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहकांना कागदी रोल मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ज्या आस्थापनाकडे तिकिटाचे कागदी रोल पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यांच्याकडून कागदी रोल पुरवले जात नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे कागदी रोल मिळवून तो यंत्राला बसवल्याविना तिकीट देता येत नसल्याचे वाहक सांगत आहेत. प्रतिदिन अनुमाने २०० हून अधिक तिकिटे द्यावी लागत असल्यामुळे कधीकधी स्वत:च्या खिशातून कागदी रोल मिळवून प्रवाशांना तिकीटे द्यावी लागत असल्याचे वाहकांनी सांगितले. याविषयी सातारा आगारप्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
आधीच अडचणीत असलेल्या वाहकांना या समस्येवर मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे ‘आमच्या खिशाला भुर्दंड सोसावा लागत आहे’, अशी तक्रार वाहक करत आहेत. एस्.टी. प्रशासनाने यावर त्वरित उपाय काढावा, अशी अपेक्षा वाहक व्यक्त करत आहेत. |