हिंदु धर्मविरोधकांना चाप !

‘माझी पत्नी किरण राव हिला भारतात रहायला भीती वाटते’, असे विधान करणारे आणि ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’ यांसह हिंदी चित्रपटांमधून नेहमीच हिंदु देवतांचा मोठ्या प्रमाणात अवमान करणारे अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात आपटला आहे. आमीर खान हा असा अभिनेता आहे, जो अत्यंत खुबीने ‘सत्यमेव जयते’ असो वा फटाक्यांच्या संदर्भातील विज्ञापन असो वा चित्रपट असो, यांतून नेहमीच हिंदूंना तुच्छ लेखून, हिंदूंच्या देवतांचे विडंबन करून, ‘हिंदु धर्मात अंधश्रद्धा आहेत’, असे सांगून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करतो. त्यामुळे यंदा हिंदु प्रेक्षकांनीही आमीर यांना झटका द्यायचे ठरवले होते. त्यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हिंदूंनी ‘बॉयकॉट (बहिष्कार) लाल सिंग चढ्ढा’, असेच ठरवले होते. वास्तविक ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्याचा अवमान असल्याने याला चित्रपट परिनिरीक्षक मंडळाने अनुमती नाकारणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. यानंतर मात्र जागरूक हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे आमीर खान यांचे वास्तव वारंवार लोकांसमोर आणले आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. ‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट हिंदूंनी पाहू नये; म्हणून काही राष्ट्रप्रेमी एकटेच फलक घेऊन चित्रपटगृहाबाहेर उभे राहिले, काहींनी हातात ध्वनीवर्धक (माईक) घेऊन येणार्‍या प्रेक्षकांचे प्रबोधन केले, तर काही युवकांनी चित्रपटगृहाबाहेर आंदोलन केले. देशात असे अनेक ठिकाणी घडले.

एकूणच हिंदूंच्या सामूहिक आंदोलनामुळे ‘१५० कोटी रुपये व्यय करून सिद्ध केलेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ला अनुमाने १०० कोटी रुपयांची हानी सहन करावी लागू शकते’, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या मासात आलेल्या ‘समशेरा’ चित्रपटात अभिनेते संजय दत्त यांना जाणीवपूर्वक डोक्यावर शेंडी ठेवून आणि धार्मिक असून खलनायक असे दाखवण्यात आले होते. हा चित्रपटही पूर्णत: ‘फ्लॉप’ झाला. याच काळात ‘कार्तिकेय २’ हा भगवान श्रीकृष्णावर आधारित तेलुगु चित्रपट यशस्वी झाला आहे. याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !