बिहारच्या नव्या मंत्रीमंडळातील ७२ टक्के मंत्र्यांवर गुन्हे नोंद !

५३ टक्के मंत्र्यांविरुद्ध गंभीर गुन्हे

नवी देहली – ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार बिहारच्या राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्या नव्या  युती सरकारच्या मंत्रीमंडळात ७२ टक्के मंत्र्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्धही गुन्हे नोंद आहेत.

१. ‘ए.डी.आर्.’ आणि ‘बिहार इलेक्शन वॉच’ यांनी मुख्यमंत्र्यांसह ३३ पैकी ३२ मंत्र्यांच्या वर्ष २०२० मधील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीचे विश्‍लेषण केले आहे.

२. ‘ए.डी.आर्.’च्या अहवालानुसार २३ मंत्र्यांविरुद्ध (७२ टक्के) गुन्हेगारी प्रकरणे नोंद आहेत. यांपैकी १७ मंत्र्यांविरुद्ध (५३ टक्के) गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच २७ मंत्री (८४ टक्के) कोट्यधीश आहेत.

बिहारचे कायदामंत्री कार्तिकेय सिंह यांच्यावरही गुन्हे नोंद

बिहारचे कायदामंत्री कार्तिकेय सिंह यांच्यावरही अनेक गुन्हे नोंद आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावर १६ ऑगस्ट या दिवशीच अपहरणाच्या प्रकरणी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी वॉरंट काढण्यात आले होते. याच दिवशी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. कार्तिकेय सिंह हे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषदेतील आमदार आहेत. ते पूर्वी शिक्षक होते.

कार्तिकेय सिंह यांनी त्यांच्यावरील आरोपाविषयी सांगितले, ‘माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला याविषयी सर्व माहिती दिली आहे. आरोप होणे आणि ते सिद्ध होणे यांत भेद आहे. अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही. बिहारमध्ये जंगलराज आलेले नाही.’

संपादकीय भूमिका

देशात आता लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यावर गुन्हे नोंद असणे ही त्यांची पात्रता समजली जाऊ लागली आहे आणि जनताही अशांना निवडून देत आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहे, हे लक्षात घ्या !