उपवास करण्यामागील उद्देश आणि त्याचे महत्त्व !
‘पुष्कळसे श्रद्धाळू भारतीय नियमितपणे ठराविक दिवशी, पर्वासारख्या विशेष दिवशी किंवा व्रताच्या वेळी उपवास करतात. त्या दिवशी काही जण दिवसातून एकदाच भोजन करतात किंवा काही जण फलाहार करतात, तर काही जण साधा आहार घेतात. काही जण पाणीही न पिता अगदी कडक निर्जल उपवास करतात. ईश्वराला प्रसन्न करणे किंवा स्वतःला शिक्षा म्हणून प्रायश्चित्त घेणे आणि कधी कधी विरोध प्रकट करणे यांसाठी उपवास केला जातो.
१. ‘उपवास’ या शब्दाचा अर्थ
संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.
२. उपवास केल्याने होणारे लाभ
अ. मनुष्याचा पुष्कळसा वेळ आणि शक्ती ‘खाण्या-पिण्याच्या वस्तू गोळा करणे, स्वयंपाकाची सिद्धता करणे, स्वयंपाक करणे, जेवणे अन् ते पचवणे’, यांमध्ये व्यतीत होते. काही विशेष प्रकारचे भोजन आपल्या मेंदूला मंद आणि विचलित करते. त्यामुळे काही ठराविक दिवशी व्यक्ती हलका आणि साधा आहार घेऊन किंवा काहीच न खाता स्वतःचा वेळ अन् शक्ती वाचवण्याचा निश्चय करते. त्यामुळे तिचे मन सतर्क आणि निर्मळ होते.
आ. परिणामी माणसाचे मन भोजनाच्या विचारांमध्ये मग्न रहाण्यापेक्षा ते चांगले विचार ग्रहण करू लागते.
इ. माणसाला कार्यक्षम रहाण्यासाठी थोड्या विश्रांतीची किंवा पालटाची आवश्यकता असते. उपवास केल्यामुळे शरिराला विश्रांती मिळते आणि आहारातील पालटामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे उपवास करणे संपूर्ण शरिरासाठी पुष्कळ लाभदायक ठरते.
ई. मनुष्य जेवढा अधिक इंद्रियांच्या अधीन जातो, तितक्या त्याच्या इच्छा वाढत जातात. उपवासामुळे मनुष्याला इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी साहाय्य होते. उपवासामुळे हळूहळू इच्छा नाहीशा होतात आणि मन संतुलित अन् शांत रहाण्यासाठी साहाय्य होते.
३. उपवास करण्यामागील उद्देश
‘उपवासामुळे आपण दुर्बल आणि चिडचिडे होऊ किंवा नंतर आपली खाण्याची इच्छा अधिकच वाढेल’, असा उपवास करू नये. सहसा उपवास करण्यामागे उत्तम आणि उदात्त हेतू नसल्यासच असे होते. काही लोक केवळ वजन घटवण्यासाठी, तर काही लोक ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी उपवास करतात. काही लोक आपल्या संकल्पशक्तीचा विकास करण्यासाठी, काही जण इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काही तपश्चर्या म्हणून उपवास करतात.
४. भगवद्गीतेत शुद्ध आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व सांगितलेले असणे
भगवद्गीता उपयुक्त आहारावर भर देते. युक्त आहार म्हणजे अगदी अल्प नाही आणि पुष्कळही नाही, असा आहार. उपवास न करतासुद्धा ‘शुद्ध, सात्त्विक, साधा आणि पौष्टिक आहार घ्यावा’, असे भगवद्गीता सांगते.’
(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, सप्टेंबर २००३)