कृष्णाला सखा मानून त्याच्याशी संवाद साधतांना साधिकेला सुचलेली भावपुष्पे !
मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून त्याच्याकडे पहात असतांना मला वाटते, ‘सगळे काही तिथेच थांबले आहे.’ माझ्या मनात कृष्णाविषयी एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मला काव्य किंवा लिखाण सुचते. पूर्वी मी कधीच कविता केल्या नाहीत. मला कविता सुचण्याचा आरंभ कृष्णाच्या चित्रासमोर बसल्यावर झाला.
कैसे तुज स्थापावे हृदयीच्या मंदिरी ।
‘हे श्रीहरि, तुझी मुरली ही केवळ मुरली नाही, ती सर्व भक्तांच्या हृदयाचा ठाव घेणारी तुझी प्रेमळ साद आहे ! कान्हा, त्याचे स्वर इतके व्याकुळ करतात की, त्या ओढीचे मी वर्णन करू शकत नाही. जसा तू अवर्णनीय आहेस, तशी तुझ्याप्रती निर्माण होणारी ओढही अवर्णनीय आहे ! कान्हा, ती ओढ केवळ तूच जाणू शकतोस आणि तूच ती शांत करू शकतोस ! तुझ्या दर्शनानेच तू मला तृप्त करू शकतोस. हे प्रियवर, जिथे शुद्ध भाव नाही, तिथे तुझ्या स्वरूपाचे दर्शन होत नाही; पण अज्ञानाने आंधळ्या झालेल्या जिवाला ते ज्ञानचक्षू तूच प्रदान करू शकतोस ना ? हे नारायणा, मला तुझ्यापासून दूर ठेवू नकोस. माधवा, तुझ्या चरणी घे. तुझ्याविना आम्हाला कोण आहे ?’
मुरलीच्या मधुर स्वरांनी हरपले देहभान ।
सारे बंध तोडूनी कान्हा, येऊ कसे सांग ।
छेडूनी मधुर तान व्याकुळ का करिसी ।
जळी-स्थळी केशवा, मज तूची स्मरसी ।। १ ।।
तुझे नाम, तुझे रूप घेई हृदयाचा ठाव ।
परि मन शुद्ध नाही, ठेवू कैसा भाव ।
कैसे तुज स्थापावे हृदयीच्या मंदिरी ।
तुझी श्रीमूर्ती कैसी वसावी चित्तगाभारी ।। २ ।।
किती काळ गेला हरि, तुझिया स्मरणाविना ।
कैसे आळवू तुज प्रभु, आर्त भावाविना ।
अज्ञानास कैसे दर्शन घडेल ज्ञानचक्षूविना ।
उद्धार करी नारायणा कोण आहे तुझ्याविना ।। ३ ।।
भगवंता, हे जे काही आहे, ते सारे तुझेच आहे. तुझ्याच चरणी सारे अर्पण !
– कु. वैष्णवी जाधव (आताच्या सौ. अनन्या अक्षय पाटील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |