रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. देवीप्रसाद सालियन (वय ३७ वर्षे) यांची त्यांच्या पत्नीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. देवीप्रसाद सालियन यांचा १८.८.२०२२ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. देवीप्रसाद सालियन यांना सनातन परिवाराच्या वतीने ३७ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. सासरी नातेवाइकांशी सहजतेने रहाता येण्यासाठी पत्नीला साहाय्य करणे
‘८.१२.२०२१ या दिवशी माझे लग्न श्री. देवीप्रसाद यांच्याशी झाले. लग्न झाल्यानंतर मी कर्नाटक येथील त्यांच्या घरी गेले. तेव्हा तेथील वातावरण, भाषा आणि नातेवाईक हे सर्व माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते. मला सासरच्या लोकांचे स्वभाव ठाऊक नव्हते, तसेच मला त्यांची भाषाही कळत नव्हती. तेव्हा त्या सगळ्यांशी सहजतेने रहाण्यासाठी श्री. देवीप्रसाद यांनी मला वेळोवेळी साहाय्य केले. त्यामुळे मला सासरी वावरतांना ताण आला नाही.
२. पती-पत्नीतील सुसंवाद टिकून रहाण्यास साहाय्य करणे
कधीकधी आमच्या दोघांमध्ये वाद होईल, अशी स्थिती निर्माण होते. तेव्हा ते शांतपणे माझे म्हणणे ऐकून घेतात. त्यामुळे आमच्यातील वाद संपून सुसंवाद होतो. श्री. देवीप्रसाद यांच्या मते पती-पत्नीच्या नात्यात प्रांजळपणा, प्रामाणिकपणा, सुसंवाद, विश्वास आणि मैत्री या गुणांची आवश्यकता आहे. हे गुण आमच्या नात्यात टिकून रहाण्यासाठी ते मला नेहमी साहाय्य करतात.
३. पत्नीला साधनेत साहाय्य करणे
अ. आश्रमात सेवा करतांना माझ्याकडून काही चुका झाल्या किंवा मला व्यष्टी साधनेच्या अंतर्गत आढाव्यात सांगितलेले दृष्टीकोन पटकन स्वीकारता आले नाहीत, तर त्याविषयी मी श्री. देवीप्रसाद यांना सांगते. तेव्हा ते मला शांतपणे माझ्या चुकांची जाणीव करून देतात आणि ‘मी याविषयी कुणाशीतरी मोकळेपणाने बोलून घ्यावे’, असे मला सांगतात.
आ. चुका झाल्यानंतर माझ्या मनाची विचारप्रक्रिया अयोग्य आणि नकारात्मक झाल्याने माझ्या मनात नोकरी करण्याचे विचार तीव्रतेने येत होते. तेव्हा श्री. देवीप्रसाद यांनी माझ्या मनावर साधना आणि गुरु यांचे महत्त्व बिंबवले. आता ते मला पुन्हा आश्रमजीवनाशी एकरूप होऊन सहजतेने रहाण्यास शिकवत आहेत.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे गुरुमाऊली, माझे भाग्य थोर असल्यामुळे तुम्ही मला गुरुरूपात मिळालात. ‘तुम्ही मला आध्यात्मिक पती दिलात’, याबद्दल मी तुमच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘श्री. देवीप्रसाद यांची लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती होवो आणि त्यांच्यातील गुण मला आत्मसात् करता येवोत’, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) दर्शना देवीप्रसाद सालियन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.