श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे) यांनी काढलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राविषयी तिला आलेल्या अनुभूती

उडतरे, वाई (जिल्हा सातारा) येथील कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे) यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी काढलेल्या चित्राविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. मानसी जगताप यांनी काढलेले श्रीकृष्णाचे चित्र

१. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णाचे तत्त्व जाणवून श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा विचार मनात येणे

‘११.८.२०२० या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णाची पूजा केली होती. सकाळी भ्रमणभाषवर श्रीकृष्णाची आरती आणि पाळणा लावला होता. सगळीकडे ‘श्रीकृष्णाचे तत्त्व आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी अकस्मात् माझ्या मनात श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा विचार आला.

कु. मानसी जगताप

२. प्रार्थना करून माहितीजालावर (‘इंटरनेट’वर) पाहून श्रीकृष्णाचे चित्र काढणे

मी श्रीकृष्णाचे चित्र माहितीजालावर पाहिले. आरंभी मी श्रीकृष्णाला ‘तूच हे चित्र माझ्याकडून भावपूर्ण काढून घे’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर चित्र पुष्कळ सुंदर रेखाटले गेले. श्रीकृष्णाने मला जे रंग सुचवले, ते मी त्यात भरले. त्यानंतर मी त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

३. चित्राच्या डोळ्यांतील चैतन्य आणि स्मितहास्य पाहून कुटुंबीय भावुक होणे

त्या दिवसापासून आम्ही घरातील सर्व जण त्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे जाता-येता पहात होतो. त्याच्या डोळ्यांतील चैतन्य आणि चेहर्‍यावरील स्मितहास्य पाहून कुटुंबीय भावुक झाले.

४. श्रीकृष्णाचे चित्र आश्रमात पाठवतांना ‘घरातील व्यक्तीच आश्रम भेटीसाठी जात आहे’ असे जाणवणे

माझी आत्या सौ. हर्षदा बुणगे आणि तिचे यजमान श्री. संजय बुणगे हे रामनाथी आश्रमात श्रीकृष्णाचे चित्र घेऊन जाण्यापूर्वी मी घरातील सर्वांना एकदा दाखवले. त्या वेळी घरातील सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले. चित्र पाठवतांना ‘घरातील व्यक्तीच आश्रम भेटीसाठी जात आहे’, असे मला वाटत होते.’

– कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे), उडतरे, वाई, सातारा. (११.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक