गुरुवार, १८ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।।
अर्थ : वसुदेवाचा पुत्र; कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्या, देवकीला परमानंद देणार्या आणि संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणार्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.
श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘दहीहंडी फोडणे किंवा दही, दूध आणि लोणी घेऊन जाणार्या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा समजलेला भावार्थ !
धर्माने सांगितलेल्या परंपरांचा विचार केल्यावर प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक आणि आध्यात्मिक अर्थ पूर्ण आकलन होतो आणि त्यानंतर धर्माचरण सहजसुलभ अन् आनंददायी होते. गोकुळातील गवळणी आणि गोपी मडक्यांतून दूध, दही, लोणी घेऊन बाजारात जात असत. तेव्हा बालकृष्ण ती मडकी फोडत असे. माझ्या मनात ‘या बाललीलेचा अर्थ काय ? किंवा जन्माष्टमीलाही दहीहंडी फोडली जाते, त्याचा भावार्थ काय आहे ?’, असा सुप्त प्रश्न होता. एकदा ‘नको वाजवू श्रीहरि मुरली’… हे भजन ऐकतांना श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या सर्व प्रश्नांची आध्यात्मिक उकल झाली.
१. गुह्य ज्ञानाची उकल करून ज्ञान देणारे श्री सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेव डॉ. आठवले !
‘भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, ‘हे माझे गुह्य ज्ञान (गीता सार, गीता ज्ञान) इतरांना सांगणारा माझा भक्त मला अधिक प्रिय आहे.’ आता भगवद्गीता सर्वच वाचतात, ती इतरांना वाटतात किंवा तिचे पठणही करतात; परंतु त्यात श्रीकृष्णाला अपेक्षित असलेले गुह्य ज्ञान सर्वांना कळणे शक्य नाही. स्वयं श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सहस्रो साधकांच्या माध्यमांतून अध्यात्मातील अनेकानेक गुह्य ज्ञानांची उकल करून ते जगापुढे ठेवले आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांचा, जन्माष्टमीला दहीहंडी फोडणे आदी घटनांचा त्यांनी लक्षात आणून दिलेला भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.
२. दही, दूध किंवा लोणी घेऊन जाणार्या गोपींचे मडके भगवान श्रीकृष्णाने फोडणे किंवा जन्माष्टमीला दहीहंडी फोडणे
२ अ. मडकी किंवा हंडी : आध्यात्मिकदृष्ट्या जिवाला (प्राण्याला, मनुष्याला) ‘घट’ संबोधले जाते. घटा-घटांत अंतर्बाह्य चैतन्यस्वरूपात श्री सच्चिदानंद परब्रह्म व्यापून असते, तसेच व्यावहारिक जीवनात घट म्हणजे गाडगे, मडके, घागर किंवा हंडी.
२ आ. व्यवहारात दूध, दही किंवा लोणी या विविध अवस्था साधकाच्या साधनेतील अवस्थांचे प्रतीक असणे : व्यावहारिकदृष्टीने लोणी काढण्यापूर्वी दुधाला विरजण लावून त्याचे दही केले जाते. नंतर ते दही रवीने घुसळून ताक करतांना लोणी वर येते. साधनेतही श्रीगुरु विविध प्रक्रियांद्वारे साधकाचे मन, बुद्धी आणि चित्त घुसळून त्याला साधनेच्या विविध अवस्थांतून नेतात. त्यातून अंती त्याला लोण्याप्रमाणे नवनीत, म्हणजेच शुद्ध चित्ताची एक दिव्य अवस्था प्राप्त होते. जसे प्रसववेदनांच्या अग्नीदिव्यानंतर स्त्रीमध्ये वात्सल्य निर्माण होते आणि तिला मातृत्व लाभते, तसा गुरूंच्या मार्गदर्शनांतर्गत समर्पितभावाने परिश्रम करणार्या साधकांमध्ये भावभक्तीचा उदय होतो. बाळाविषयी प्रेमाचा पान्हा फुटून जसे आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण होते, तसेच गुरूंविषयी, भगवंताविषयी साधकामध्ये प्रेम निर्माण होऊन त्याला भावभक्तीचा पान्हा फुटायला लागतो. दूध हे सत्त्वगुणाचे प्रतीक आहे, तर दही हे सत्त्वगुणाच्या लयाचा प्रारंभ दर्शवणारे, तर लोणी हे गुणातीत अवस्थेचे प्रतीक आहे. साधकातील सत्त्वगुणाचा लय होऊन साधकाला गुणातीत अवस्था प्राप्त होणे, हे साधनेचे अंतिम साध्य असते. गोपींचे मडके बालकृष्णाने फोडणे हे एक प्रकारे गोपींना (साधकांना) सत्त्वगुणातून पुढे गुणातीत अवस्थेत नेऊन अद्वैताची अनुभूती देण्याच्या आध्यात्मिक लीलेचा संकेत आहे.
२ इ. गोपी दूध, दही किंवा लोणी यांचे मडके डोक्यावर ठेवून घेऊन जाणे आणि श्रीकृष्णाने ते फोडणे (तसेच जन्माष्टमीला दहीहंडी फोडणे) याचा जिवाच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक अवस्थेशी असलेला संबंध : गोपी दूध, दही किंवा लोणी यांचे मडके डोक्यावर ठेवून घेऊन जाणे आणि श्रीकृष्णाने ते फोडणे किंवा जन्माष्टमीला दहीहंडी फोडणे हे जिवाच्या साधनेच्या प्रवासाचे, म्हणजे पूर्णत्वाकडे जाणार्या विविध सत्त्वगुण ते गुणातीत टप्प्यांचे प्रतीक आहे. जीव अधोमुखी आणि परमात्मा ऊर्ध्वमुखी असतो. आध्यात्मिकदृष्ट्या दहीहंडीत दोन घट (गाडगे) असतात. त्यातील एकाचे मुख खाली, म्हणजे अधोमुखी असलेले, तर एकाचे वर म्हणजे ऊर्ध्वमुखी असते. परमात्म्याचे प्रतीक असलेल्या ऊर्ध्वमुखी घटाचे प्रतीक हे दहीहंडीसाठी फोडण्यासाठी बांधलेले मडके, तर दहीहंडी फोडणारा मुमुक्षू (मनुष्य) हा अधोमुखी घटाचे प्रतीक होय. त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
२ इ १. पहिला घट : हे दहीहंडीसाठी बांधलेले मडके, म्हणजे परमात्म्याचे प्रतीक आहे.
अ. भावार्थ : व्यावहारिक दृष्टीने दहीहंडीसाठी गोपालकाल्याच्या वेळी भरलेले मडके दोरीला काही उंचीवर बांधले जाते. या मडक्याचे मुख ऊर्ध्वदिशेला असते. हे म्हणजे अवतरित होण्यास उत्सुक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्माचे प्रतीक आहे. जसे घटस्थापनेला आपण घटामध्ये शक्तीचे आवाहन करतो, त्याचप्रमाणे दहीहंडीमध्ये परमात्याचे आवाहन केले जाते. दहीहंडी फोडतांना हे मडके खालून फोडले जाते. हा भक्ताला भगवंताच्या निम्न स्थितीला अवतरणाचा संकेत आहे.
२ इ २. दुसरा घट : आध्यात्मिकदृष्टीने प्रत्येक प्राण्याच्या देहाला घट समजले जाते. तो प्राणी चैतन्यामुळे जिवंत समजला जातो. मनुष्यदेहाला ‘नवद्वार पुरी’ म्हटले आहे. त्याचे दशमद्वार म्हणजे ब्रह्मरंध्र ! ते उघडल्यावर त्याचे परमात्म्याशी मीलन होते आणि तो जन्म-मृत्यू चक्राच्या फेर्यांतून मुक्त होतो. हेच अद्वैत होय. सामान्यतः मनुष्यरूपी घट हा अधोमुखी असतो आणि ब्रह्मरंध्रद्वार उघडल्यानंतर तो ऊर्ध्वमुखी होतो.
अ. भावार्थ : अधांतरी बांधलेला घट, म्हणजे दहीहंडी अनेक ठिकाणी फोडली जाते; परंतु आध्यात्मिकदृष्ट्या ‘दहीहंडी फोडता येणे’, हे मुमुक्षूला परमात्म्याच्या कृपाप्राप्तीचा संकेत असून दहीहंडी फोडणार्या साधकाला आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्वरप्राप्ती झाल्याचे द्योतक आहे.
३. ‘दूध, दही किंवा लोणी घेऊन जाणार्या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा भावार्थ
३ अ. श्रीकृष्णाने गोप-गोपींचे (भक्तांचे) मडके फोडणे, म्हणजे द्वैत नष्ट करून त्यांना अद्वैताची अनुभूती देणे : साधक, भक्त यांना व्यष्टी स्तरावर आत्मस्वरूपाची अनुभूती आल्यानंतरही सर्वव्यापी परमात्म्याशी एकरूपता अनुभवण्याची त्यांची प्रक्रिया चालू असते. दहीहंडी फोडण्याच्या माध्यमांतून भगवंत किंवा श्री गुरु शिष्याच्या द्वैत भावाला नष्ट करून अद्वैत अवस्थेत स्थिर करतात. या प्रक्रियेला ‘मडके फोडले (भेद संपवला किंवा द्वैत नष्ट केले)’, असे म्हणतात. दहीहंडी फोडणे हे परमात्म्याच्या पूर्णकृपेचे द्योतक आहे. पूर्णकृपा झाल्याने भक्ताचे दशमद्वार (ब्रह्मद्वार) उघडून भक्ताला ऊर्ध्वगती लाभते आणि त्याला एकत्वाची, म्हणजेच अद्वैताची अनुभूती येते.
३ आ. श्रीकृष्णाने गोप-गोपींचे मडके फोडणे, म्हणजे सलोक मुक्तीतून सायुज्य मुक्ती प्रदान करणे : अनेक जन्मांपासून भगवद्प्राप्तीसाठी साधना करणारे ऋषिमुनी मधुरा भक्तीद्वारे भगवंताशी एकरूप होण्यास गोप-गोपी रूपात अवतरले होते. भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपात त्याच्या सान्निध्यात राहून सलोक, समीप मुक्ती, तर त्यानंतर भगवंतापासून दूर आणि विरहात राहून स्वरूप अन् सायुज्य मुक्ती (भगवंताशी एकरूपता अनुभवणे) मिळवणे, यासाठी त्यांना हा जन्म लाभला होता. महाभारतातील भगवंताच्या लीलेत ‘श्रीकृष्णाने क्रमाक्रमाने गोप-गोपींचे मडके फोडणे, म्हणजे भगवद्कृपेने त्यांचे दशमद्वार उघडून त्यांच्या द्वैतभावाचा लय करून अद्वैतानुभूती दिली आणि नंतर त्यांनी मथुरेला प्रयाण केले’, असा अर्थ होतो. थोडक्यात श्रीकृष्णाने गोपींना सलोक, समिप मुक्तीतून आता स्वरूप आणि सायुज्य मुक्ती प्रदान केली.’
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१४.९.२०१७)
‘नको वाजवू श्रीहरि मुरली रे’, या भजनातील पंक्तीविषयी लक्षात आलेला भावार्थ
नको वाजवू श्रीहरि मुरली रे ।
तुझ्या मुरलीने तहानभूक हरली रे ।।
घागर घेऊन पाणियासी जाता ।
डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्णकृपेने ।
राधागौळण घाबरली ।।
या भजनाचा भावार्थ म्हणजे येथे राधा ही भक्ताचे प्रतिनिधत्व करते. जेव्हा भक्त खर्या अर्थाने भगवंताच्या स्मरणात रममाण होतो, तेव्हा त्याची तहान-भूक हरपते, म्हणजेच त्याची देहबुद्धी नष्ट होते, असे येथे सूचीत केले आहे. डोक्यावरील घागर ही निर्गुण परमात्म्याचे प्रतीक असून भक्ताच्या जीवनात भगवंत हाच केंद्रबिंदू झाला असून भक्त भगवंतालाच सतत मस्तकी धारण करून सदा मिरवत असतो, याचे ते प्रतीक आहे.
येथे ‘घागर पाझरते’ म्हणजे परमात्म्याची पूर्णकृपा होते. पूर्णकृपेमुळे भक्ताचे दशमद्वार (ब्रह्मरंध्र) उघडून दशमद्वारातून आता भक्ताचे निर्गुणाशी अनुसंधान निर्माण होते, म्हणजेच आनंदप्राप्ती होते आणि त्याला अद्वैतानुभूती येते. (भक्तीची दहीहंडी फुटते.) पूर्णकृपाप्राप्तीने ईश्वराशी एकरूपता, म्हणजे अद्वैतानुभूती आल्याने ‘राधागौळण घाबरली’, असे म्हणणे सांकेतिक आहे. द्वैतभावात असतांना शिष्य किंवा भक्त यांना गुरूंचा आधार वाटतो. गुरूंच्या आधारामुळे आश्वस्त असल्याने ते अद्वैतात जायला बाह्यतः सिद्ध नसतात. अद्वैतात, म्हणजेच महाशून्यात प्रवेश करतांनाची अवस्था शेवटच्या ओळीत व्यक्त केली आहे. जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडण्याच्या प्रक्रियेतून हीच आध्यात्मिक प्रक्रिया घडणे अपेक्षित असते.’
– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१४.९.२०१७)