घराघरांवर, गाड्यांवर उभारलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवावेत ! – जिल्हााधिकार्यांचे आवाहन
पणजी, १७ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. यासाठी राज्यघटनेच्या कलम २ प्रमाणे लागू असलेली ध्वजसंहिता शिथिल करण्यात आली होती; मात्र आता शिथिलतेची मुदत संपल्याने नागरिकांनी घराघरांवर, गाड्यांवर उभारलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मामू हागे यांनी केली आहे. राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घटनेतील ध्वजसंहितेतील नियम कडक आहेत; मात्र ३ दिवसांसाठी हे नियम शिथिल करण्यात आले होते. आता शिथिल केलेली ही ध्वजसंहिता मागे घेण्यात आली असून नागरिकांनी घरांवर आणि वाहनांवर उभारलेले राष्ट्रध्वज खाली उतरवणे आणि ते सन्मानपूर्वक उतरवणे अपेक्षित आहे.
डिचोली आणि म्हापसा येथे राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून जनतेचे प्रबोधन !
राष्ट्रध्वज अजूनही काही दुकानांत, रस्त्यावरील खांबांवर, घरांवर उभारलेले वगैरे दिसतात. डिचोली येथील काही राष्ट्रप्रेमी नागरिकांनी बाजारपेठेत फिरून राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि त्याची विटंबना होऊ नये, यासाठी १७ ऑगस्टला सायंकाळी जागृती केली. ही मोहीम पुढेही चालू रहाणार आहे, म्हापसा येथेही राष्ट्रप्रेमी नागरिक आणि स्वराज गोमंतक संघटना यांच्याकडून अशाच प्रकारे जागृती करण्यात येत आहे. म्हापसा येथील बाजारपेठेतील काही तुरळक दुकानदार वगळता अनेक दुकानदारांनी राष्ट्रध्वज उतरवले होते. इतरांचे प्रबोधन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी घरांवर अद्यापही दिसून येणारे राष्ट्रध्वज उतरवले जावेत, यासाठी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले आहे. त्याचप्रमाणे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनीही लोकांना राष्ट्रध्वज उतरवून सन्मानपूर्वक जतन करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रध्वज जमा करण्याची मोहीम राबवण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक कसा गुंडाळून ठेवावा, याविषयी संस्कृती मंत्रालयाने सांगितलेले टप्पे !
१. राष्ट्रध्वज आडवा ठेवावा. (छायाचित्र १)
२. मधल्या पांढर्या पट्ट्याखाली बाजूचे केशरी आणि हिरवे पट्टे असलेला भाग दुमडावा. तो दुमडतांना केशरी आणि हिरव्या पट्ट्यांचा काही भाग दुमडू नये. (छायाचित्र २)
३. त्यानंतर उर्वरित २ बाजू केवळ अशोकचक्र दिसेल अशा प्रकारे दुमडावा. (छायाचित्र ३)
४. केशरी आणि हिरव्या पट्ट्यांसह अशोकचक्र दिसणारा हा दुमडलेला राष्ट्रध्वज जतन करण्यासाठी तळहातावरून न्यावा. (छायाचित्र ४)