संस्कृतदिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेत गीतरामायणाचे सादरीकरण !
सांगली – संस्कृतदिनाच्या निमित्ताने संस्कृत मैत्र आणि पाटणकर संस्कृत वर्ग यांच्या वतीने ‘आठवले विनय प्रशालेत’ संस्कृत गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कु. मृणाल कुलकर्णी हिने संस्कृतदिनाचे महत्त्व विषद केले. कु. यश निरलगी याच्या ‘कुल लव रामायण गीतम्’ या गाण्याने संस्कृत गीतरामायणाचा प्रारंभ झाला. दैनिक ‘केसरी’चे पत्रकार श्री. संजय हेब्बाळकर यांची कन्या कु. साक्षी हेब्बाळकर हिने ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘पराधीन आहे जगती’, ‘देव हो बघा रामलीला’, ‘सूड घे त्याचा लंकापती’ अशी अनेक गाणी संस्कृत भाषेत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. गीतरामायणाचा प्रवास दीपक पाटणकर यांनी स्वत:च्या रसाळ निवेदनातून घडवला. प्रणव लिमये (संवादिनी), केतन आठवले (तबला), राजाभाऊ कुलकर्णी (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.