आरेतील जंगल वाचवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी !
मुंबई – मेट्रोच्या नावाखाली आरे वसाहतीमधील जंगल नष्ट करून पर्यावरणाचा र्हास होऊ देऊ नये, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. ‘आरे संवर्धन गटा’ने यासंबंधीचे ई-मेल राष्ट्रपतींना केले आहे.
‘आरे संवर्धन गटा’चे सदस्य यश मारवाह म्हणाले की, पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी यांच्याकडून होणारा विरोध डावलून राज्य सरकार आरे वसाहतीमधील कारशेडचे काम करत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि राज्य सरकार, तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम्.एम्.आर्.सी.) यांच्यातील वाद चिघळला आहे. एम्.एम्.आर्.सी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून आरे वसाहतीत वृक्षतोड करत आहे. राज्य सरकारला त्यांचे पाठबळ असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबत आहे. शक्य तितक्या लवकर कारशेडचे काम बंद करून आरे वाचवणे आवश्यक आहे.