‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे’, अशी जनभावना आहे ! – मुख्यमंत्री
खंबीरपणे उभे राहून ४० दिवसांत ७५० निर्णय घेतल्याचे प्रतिपादन !
मुंबई – नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागांमध्ये गेलो होतो. निसर्गाने आमच्या सरकारला आशीर्वाद दिला. आम्ही गेल्या ४० दिवसांत ७५० निर्णय घेतले. निर्णय घेण्यासाठी खंबीरपणे उभे रहावे लागते. आम्ही शेतकर्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. शेतकर्यांच्या मागे उभे रहाणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. २ हेक्टरऐवजी त्यांना ३ हेक्टरपर्यंत साहाय्य मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. १७ ऑगस्टपासून चालू होणार्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘याआधीच्या सरकारने घाईगडबडीत निर्णय घेतले. मग आम्ही त्यांचा आढावा घ्यायचा कि नाही ? त्या निर्णयांचा आम्ही अभ्यास करू. आवश्यकतेनुसार त्यांना प्राधान्य देऊ. आम्ही अत्यावश्यक कामे रहित केलेली नाहीत. कुठलाही निर्णय आकसापोटी घेणार नाही, तसेच कोणत्याही निर्णयाला स्थगिती देणार नाही, हे विरोधी पक्षाने लक्षात घ्यावे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेतून सरकार स्थापन झाले आहे. आम्ही विश्वासघात किंवा बेईमानी केलेली नाही. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे’, अशी जनभावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.’’
आपत्तीग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात लवकरच थेट पैसे जमा होतील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाने आम्हाला ७ पानी पत्र दिले. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला. आम्ही आवाहन करतो की, आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. ते आम्हाला म्हणतात, ‘हे बेईमानीने आलेले सरकार आहे’; परंतु आमच्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. विरोधकांना कुठेतरी गझनीची (मोगल आक्रमकाची) लागण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार वेळेत पोचले. आम्ही तात्काळ निर्णय घेतले. अतीवृष्टीच्या ठिकाणी ९५ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. राहिलेले पंचनामेही लवकरच पूर्ण करू. आपत्तीग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात लवकरच थेट पैसे जमा होणार आहेत.’’