प्रेमभाव, सहजता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (वय ७४ वर्षे) (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई) !
श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्यातील काही गुणांचे घडलेले दर्शन पुढे दिले आहे.
१. प्रेमभाव
‘पू. परांजपेआजी प्रेमभावाचा सागरच आहेत. त्या सर्वच साधकांवर पुष्कळ प्रेम करतात. त्या येता-जाता साधकांची प्रेमाने विचारपूस करून साधकांना आपलेसे करतात.
२. सहजता
पू. आजींचे वागणे आणि बोलणे यांत पुष्कळच सहजता आहे. त्या संत असूनही सर्वच साधकांशी सहजतेने बोलतात. त्यामुळे सर्व जण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.
३. पू. आजींचा त्यांचे जावई सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि ज्येष्ठ कन्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती अपार भाव आहे. पू. आजी नेहमी त्या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. पू. आजी सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतात. त्यांचे नाव जरी उच्चारले, तरीही पू. आजींची भावजागृती होते.
आ. एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘पूर्वी भाट (स्तुतीपाठक) कसे देवाचे गुणगान करायचे, तसे आपण आपल्या गुरूंचे गुणगान करूया. आपला तोच आनंद आहे. त्यांच्याविना आपल्याकडे काय आहे ? तेच आपले सर्वस्व आहेत. त्यांचेच गुणगान करून आपण आनंद घेऊया.’’ त्या वेळी आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या लाभलेल्या सत्संगाविषयी बोललो. तेव्हा आम्हा दोघींनाही पुष्कळ आनंद मिळाला.
इ. पू. आजी म्हणाल्या, ‘‘आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे महान गुरु भेटले आहेत. असे गुरु लाभणे, हे सनातनच्या साधकांचे भाग्य आहे. त्यांचा सर्वांनी लाभ करून घ्यायला हवा.’’
ई. साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना पू. आजींना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
५. पू. आजींनी सहजभावात साधकांना केलेले मार्गदर्शन
अ. त्या सर्वांना नामजप करण्यास सांगतात. त्या म्हणतात, ‘‘आपण नामजप केल्यास देवाचे चैतन्य आपल्याला ग्रहण करता येते. देव आपले सतत रक्षण करतो.
आ. आपल्यात देवाप्रती भाव सतत जागृत हवा. आपल्यात भाव असल्यास देव आपल्याला काहीही न्यून पडू देत नाही.’’ त्या आपल्या बोलण्यातून भावाचे महत्त्व पटवून देतात.
इ. त्या सांगतात, ‘‘येणारा काळ कठीण आहे. आपण साधनेचे प्रयत्न सतत करायला हवेत.’’
६. पू. परांजपेआजींच्या संदर्भातील अनुभूती
६ अ. पू. आजींशी बोलल्यावर माझे मन उत्साही होऊन माझ्या प.पू. डॉक्टरांप्रतीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या) अनुसंधानात वाढ होते.
६ आ. पू. परांजपेआजी यांच्याकडे पाहिल्यावर आनंदाची स्पंदने जाणवतात. त्या स्वतःही आनंदी असतात आणि इतरांनाही आनंद देतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आपल्याच कृपेमुळे आम्हा साधकांना अशा संतांचा सत्संग लाभतो. ‘पू. परांजपेआजींनी सांगितलेली सूत्रे आमच्या कृतीत येण्यासाठी आपणच आमच्याकडून प्रयत्न करून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६० वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |