पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘तिरंगा ऑनलाईन छायाचित्र संग्रहा’ची ‘गिनीज बूक’मध्ये नोंद !
पुणे – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने ‘युवा संकल्प अभियान’ आयोजित केले होते. ‘राष्ट्रध्वज धारण करणार्या लोकांच्या सर्वांत मोठ्या ऑनलाईन छायाचित्र संग्रहासाठी १ लाख ५२ सहस्र ५५९ छायाचित्रे प्राप्त होऊन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मानाचे स्थान निर्माण केले आहे. १५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे परीक्षक ऋषि नाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये देशातील, तसेच परदेशातील लोकांनीही सहभाग घेतला होता.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘हा विश्वविक्रम करत अमृत महोत्सवी वर्षात अमृताचा वर्षाव झाला आहे. कोणत्याही देशात त्यांच्या देशातील युवकांची प्रेरणा हीच देशाची शक्ती असते. भारताकडे या युवकांमुळेच जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य निर्माण होत आहे.’’ प्रभारी कुलगुरु डॉ. कारभारी काळे म्हणाले, ‘‘या विद्यापिठाने अनेक विक्रम केले आहेत. या विश्वविक्रमाच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळून भक्कम राष्ट्रनिर्मिती होईल.’’