‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ राबवून महाराष्ट्र राज्य शिक्षणात अग्रेसर रहाण्यासाठी प्रयत्नशील ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा गेली ८ ते १० वर्षे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांमध्ये राज्यात अग्रेसर आहे. हा जिल्हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील हा शिक्षणाचा ‘पॅटर्न’ (पद्धत) राज्यभर राबवल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात नक्कीच अग्रेसर राहील आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानात शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, पद्मश्री परशुराम गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकून रहाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमात जिल्हावासियांनी सक्रीय सहभाग घेतल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो. हा महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशाकीय अधिकारी, कर्मचारी यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यातील सिंधुकन्यांनी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. त्यांचेही मी अभिनंदन करतो. आज या निमित्ताने आपल्यामधील बंधुभाव अधिक दृढ करण्याचा निश्चय करूया.’’
या कार्यक्रमात जिल्ह्यातील वीर माता आणि वीर पत्नी यांना गौरवण्यात आले. त्यामध्ये प्रभावती गावडे, सविता कदम, रोजलीन रॉड्रीक्स, मिनाक्षी शेडगे आणि तिलोत्तमा सावंत यांचा प्रातिनिधीक गौरव करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्यांचाही गौरव करण्यात आला.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर मंत्री केसरकर यांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विविध कारणांसाठी उपोषणास बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभाच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशभक्तांची असुविधा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनायेथील नियोजन समितीच्या नूतन सभागृहात मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री केसरकर यांनी ‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची डागडुजी करणे, सर्व पथदीप (स्ट्रीटलाईट) चालू करणे, तिलारी नळपाणी योजना वेळेत पूर्ण करणे, आडाळी एम्.आय.डी.सी.तील भूखंड वाटपाचे काम चालू करणे, साथरोग उद्भवणार नाहीत, तसेच वाहतूक कोंडी होणार नाही, यांसाठी नियोजन करून गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात येणार्या भाविकांची कोणतीही असुविधा होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी’, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. |
स्वातंत्र्यसैनिकांची गाथा सांगणार्या राज्यातील पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या; मात्र ज्ञात नसलेल्या ७५ स्वातंत्र्यसैनिकांची सचित्र माहिती देणार्या ‘हरवलेली ७५ सुवर्ण पृष्ठे’, या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. ठाकरवाडी आदिवासी संग्रहालयाच्या सहकार्याने हे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
कणकवलीत ७५ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकावला राष्ट्रध्वज
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच कणकवली तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार आर्.जे. पवार यांच्या संकल्पनेतून ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते या ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात आला. या वेळी भाजपचे आमदार नितेश राणे, कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
75 ft tall Indian Flag was hoisted at Kankavali tehsil office in Sindhdurg !
So proud !
Jai Hind ! #IndependenceDay #AzadiKaAmritMahotsav #HarGharTiranga @PMOIndia @narendramodi @Dev_Fadnavis @MeNarayanRane @BJP4Maharashtra pic.twitter.com/uDF74bU37C— nitesh rane (@NiteshNRane) August 15, 2022
जिल्हा मुख्यालयातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी येथील तहसील कार्यालयाला भेट देऊन ध्वजस्तंभाची पहाणी केली. या ठिकाणी देहली येथील लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली असून ती सर्वांचे लक्ष वेधत आहे. या वेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर्.जे. पवार, नायब तहसीलदार तानाजी रासम आदी उपस्थित होते.