हिंदू संघटित झाल्यासच भारत विश्वगुरु होऊ शकेल ! – प्रा. सुभाष वेलींगकर, ‘भारत माता की जय’ संघटना
अस्नोडा येथे अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मशाल मिरवणूक
अस्नोडा, १५ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदू संघटित झाल्यासच भारत विश्वगुरु बनू शकेल, असे प्रतिपादन ‘भारत माता की जय’ संघटनेचे प्रा. सुभाष वेलींगकर यांनी केले. अस्नोडा येथे अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने ‘भारत माता की जय’, ‘हिंदु रक्षा महाआघाडी’, ‘सम्राट क्लब, अस्नोडा’, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत प्रा. सुभाष वेलींगकर उपस्थितांना संबोधित करत होते.
अस्नोडा येथे अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने मशाल मिरवणूक. भारत माता की जय,हिंदू रक्षा महाघाडी,हिंदू जनजागृती समिती व सम्राट क्लब अस्नोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तर समारोपीय कार्यक्रमात प्रा सुभाष वेलींगकर यांनी सर्वांना संबोधित केले. pic.twitter.com/IKZ1tkNW4a
— Subhash Velingkar (@SBVelingkar) August 15, 2022
ते पुढे म्हणाले, ‘‘देश स्वतंत्र झाला, त्या वेळी लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण चालू होते, तेव्हा आमच्या लक्षावधी भगिनींची अब्रू लुटली जात होती आणि १३ लाख हिंदूंची हत्या केली गेली. हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊनही ‘सर्वधर्मसमभाव’ या गोंडस शब्दांच्या आधारे राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांचे अजूनही तुष्टीकरण करतांना दिसत आहेत. ‘भारताने गोवा राज्य बळजोरीने कह्यात घेतले’, असा अपप्रचार करून गोवा स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा पोर्तुगीजधार्जिण्यांचा देशद्रोही प्रयत्न चालू आहे. पोर्तुगीजधार्जिण्यांनी देशद्रोही कृती करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हिंदू असंघटित असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आदी गोंडस शब्दांमध्ये न फसता हिंदू आणि देश यांविरोधी कृतींच्या विरोधात जागरूक राहिले पाहिजे.’’
मिरवणूक मैते, अस्नोडा येथील श्री शांतादुर्गा मंदिरापासून प्रारंभ झाली आणि मिरवणुकीचा समारोप अस्नोडा बसस्थानकाकडील हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या पुतळ्याजवळ झाला. मिरवणुकीत सहभागी हिंदूंनी ‘वन्दे मातरम्’ आदी देशभक्ती जागृत करणार्या घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.
कोण होते बाळा राया मापारी ?स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी हे गोव्या मुक्तीलढ्यातील पहिले हुतात्मा आहेत. ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये खलनायक नायकाला जीपला बांधून फरफटत नेतो, त्याप्रमाणे पोर्तुगिजांनी स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांना अर्धमेल्या अवस्थेत शिवोली येथील रस्त्यावरून फरफटत नेले होते, हा इतिहास आहे. |