कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा
कोल्हापूर – जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ कालीन विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठकीचा निर्णय घेतला आहे. बैठक घेऊन निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. त्यांनी हा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात घेतला. आढावा बैठकीत आमदार आणि खासदार यांनी जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली. या वेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पूरस्थितीमुळे झालेली हानी आणि त्याच्या भरपाईविषयीचा आढावाही घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, यापूर्वी शेतकरी, पूरग्रस्त यांना न मिळालेले साहाय्यही दिले जाईल. त्यांच्यासाठी कायमस्वरूपी निवारे बांधले जातील. रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्यांच्या पुनर्बांधकामासाठीही निधी दिला जाईल. नदीची खोली, रुंदी वाढवणे, गाळ काढणे याविषयी मंत्रालयात निर्णय घेतला जाईल.