नेमणूक झालेल्या शाळेत रुजू न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही ! – प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !
सोलापूर – काही शिक्षकांना त्यांना हवी असलेली शाळा न मिळाल्याने संबंधित शाळेत शिक्षक उपस्थित झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आता जे शिक्षक समायोजनाने मिळालेल्या शाळेत रुजू होत नाहीत, त्यांना ऑगस्टपासून वेतन मिळणार नाही, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील ९९ अतिरिक्त शिक्षकांचे ११ ऑगस्ट या दिवशी समायोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये रिक्त पदे आहेत, त्या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आली आहे; मात्र अनेक शिक्षक घरापासून दूरवरील शाळा मिळाली, आपल्याला सांभाळून घेणारा कर्मचारीवर्ग नाही, अशा कारणांसाठी त्या शाळेत रुजूच झाले नाहीत.
विद्यार्थ्यांची शिक्षकांअभावी गैरसोय होऊ नये, त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले; मात्र त्यांनी स्वत:च्या सोयीसाठी दुसरी शाळा मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक अतिरिक्त शिक्षकाला समायोजनाने मिळालेल्या शाळेत २ दिवसांत उपस्थित रहावे लागणार आहे; अन्यथा ऑगस्टपासून त्यांचे वेतन पूर्णपणे बंद केले जाणार आहे. त्यासंदर्भातील पत्र शिक्षणाधिकार्यांनी वेतन अधीक्षकांना दिले आहे.